Alert! कॅनडातील 10 लाख भारतीयांना मोदी सरकारचा इशारा; म्हणाले, 'अत्यंत सावध राहा कारण...'

India Advisory For Indians in Canada: दोन्ही देशांमधील वाद टोकाला पोहोचला असतानाचा भारताने हा इशारा जारी केला आहे. सध्याच्या उपलब्ध डेटानुसार कॅनडामध्ये 10 लाखांहून अधिक भारतीय राहतात.

स्वप्निल घंगाळे | Updated: Sep 21, 2023, 11:15 AM IST
Alert! कॅनडातील 10 लाख भारतीयांना मोदी सरकारचा इशारा; म्हणाले, 'अत्यंत सावध राहा कारण...' title=
भारत आणि कॅनडामधील संबंध कमालीचे बिघडले आहेत

India Advisory For Indians in Canada: खलिस्तानी नेता हरदीपसिंग निज्जर यांच्या हत्येमध्ये भारताचा सहभाग असल्याचा कॅनडियन पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्या आरोपानंतर दोन्ही देशांमध्ये मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. याच वादाच्या पार्श्वभूमीवर भारताने कॅनडामध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी इशारा जारी केला आहे. कॅनडामध्ये वाढत्या भारतविरोधी कारवाया आणि द्वेषपूर्ण गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर “अत्यंत सावधगिरी” बाळगावी असा सल्ला भारताने कॅनडातील आपल्या नागरिकांना दिला आहे. मंगळवारी रात्री कॅनडाने जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाचा धोका असल्याचं कारण देत कॅनडियन नागरिकांना जम्मू-काश्मीरबरोबरच लडाखमध्ये न जाण्यासंदर्भातील निर्देश देणारं पत्रक जारी केल्यानंतर आता भारतानेही अशाच पद्धतीचं पत्रक कॅनडातील भारतीयांसाठी जारी केलं आहे.

ट्रूडो यांनी आगीत ओतलं तेल

जून महिन्यात खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येशी भारतीय सरकारी एजंट्सचा 'संबंध' असल्याचा दावा ट्रूडो यांनी त्यांच्या देशाच्या संसदेत बोलताना केला. ट्रूडो यांचा हा दावा भारताने 'मूर्खपणा आणि ठराविक हेतूने प्रेरित' असल्याचं म्हणत फेटाळून लावला. मात्र कॅनडियन पंतप्रधानांनी केलेल्या या गंभीर आरोपामुळे द्विपक्षीय संबंधांवर परिणाम झाला आहे. कॅनडामधील सत्ताधारी सरकार खलिस्तानी फुटीरतावाद्यांना खतपाणी घालत असल्याच्या मुद्द्यावरुन यापूर्वीच दोन्ही देशांमध्ये तणाव असताना या आरोपांमुळे आगीत तेल ओतण्याचं काम झालं आहे.

नक्की वाचा >> 40 हजार 446 कोटींचा फटका! भारताशी पंगा घेणं कॅनडला खरंच पडणार 'महागात'

...अन् संघर्ष चिघळला

भारताने कॅनडामधील परिस्थिती पाहून सूचना आणि इशारा जारी केला आहे. कॅनडामधील भारतीय नागरिक आणि विद्यार्थी तसेच या देशात प्रवास करण्याचा विचार करत असलेल्या नागरिकांना भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सल्ला दिला आहे. 'भारतविरोधी अजेंड्याला विरोध करणार्‍या' भारतीय समुदायाच्या सदस्यांना धमक्या दिल्या जात आहेत, असं परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. भारताने जारी केलेला इशारा हा दोन्ही देशांमधील बिघडत चाललेले द्विपक्षीय संबंध अधोरेखित करत आहेत. कॅनडाच्या भूमीतून भारताविरुद्ध कुरापती करत असलेल्या खलिस्तान समर्थकांवर कारवाई करावी या भारताच्या आवाहनाकडे कॅनडाने कायमच कानाडोळा केल्याने हा संघर्ष चिघळला आहे.

भारताने काय म्हटलं आहे इशाऱ्यामध्ये?

“कॅनडामधील भारतविरोधी वाढत्या कारवाया, राजकीय हेतूने प्रेरीत द्वेषपूर्ण गुन्हे, वाढता गुन्हेगारी हिंसाचार पाहता कॅनडामधील सर्व भारतीय नागरिकांना तसेच या देशात प्रवासाचा विचार करणार्‍यांना 'अत्यंत सावधगिरी' बाळगण्याचे आवाहन करत आहोत,” असे भारताने कॅनडामधील भारतीयांसाठी जारी केलेल्या इशाऱ्यामध्ये म्हटलं आहे.

नक्की पाहा >> भारत-कॅनडा वादात अक्षय कुमार ट्रोल! Memes चा पडला पाऊस; पाहा मिम्स, जाणून घ्या कारण

अशा ठिकाणी जाणे टाळा

"मागील काही काळापासून खास करुन भारतीय मुत्सद्दी तसेच भारतविरोधी अजेंड्याला विरोध करणार्‍या भारतीय समुदायातील लोकांना धमक्या देऊन कॅनडामध्ये लक्ष्य केले आहे," असेही भारताने दिलेल्या इशाऱ्यात म्हटलं आहे. भारताने जारी केलेल्या या ट्रॅव्हल अॅडव्हायझरीमध्ये भारतीय नागरिकांना अशा प्रदेशांमध्ये प्रवास करु नये असं म्हटलं आहे. "अशा द्वेषपूर्ण घटना घडलेल्या कॅनडातील प्रांत तसेच असे संभाव्य हल्ले होण्याची शक्यता असलेल्या ठिकाणांवर जाणे भारतीय नागरिकांनी टाळावे," असा इशारा भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आला आहे.

नक्की वाचा >> भारत-कॅनडात संघर्षाची काडी टाकणारी महिला कोण? 'खऱ्या व्हिलन'ने काय केलंय पाहा

विद्यार्थ्यांना अत्यंत सावधगिरी बाळगावी

भारतीय उच्चायुक्त, दूतावास कॅनडामधील भारतीयांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कॅनडाच्या अधिका-यांशी संपर्कात आहेत, असंही भारत सरकारने स्पष्ट केलं आहे. "कॅनडामधील सुरक्षित वातावरण ढासळत चाललं असून सुरक्षेसंदर्भातील चिंता वाढली आहे. विशेषतः भारतीय विद्यार्थ्यांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचा आणि सतर्क राहण्याचा सल्ला दिला जात आहे," असे परराष्ट्र मंत्रालयाच्या अॅडव्हायझरीमध्ये म्हटले आहे.

कॅनडामध्ये किती भारतीय?

कॅनडामधील ओटावामधील भारतीय उच्चायुक्तांच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, कॅनडामध्ये 2 लाख 30 हजार भारतीय विद्यार्थी आहेत. तसेच कॅनडामध्ये तब्बल 7 लाख अनिवासी भारतीय आहेत असंही या वेबसाईटवर म्हटलं आहे.

नक्की वाचा >> 'त्या' खलिस्तान समर्थक Insta स्टोरीमुळे विराटने आवडत्या गायकाला केलं Unfollow; भाजपाकडून FIR ची मागणी

नोंदणी करुन घेण्याचं आवाहन

कॅनडातील भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांनी ओटावा येथील उच्चायुक्तालयात किंवा टोरंटो तसेच व्हँकुव्हरमधील भारतीय दूतावासाच्या वेबसाइट किंवा एमएडीएडी पोर्टल (madad.gov.in) वर स्वत:ची 'नोंदणी करणे देखील आवश्यक आहे', असे अॅडव्हायझरीमध्ये म्हटले आहे. या नोंदणीमुळे दूतावासाला 'कोणत्याही आणीबाणीच्या किंवा अप्रिय घटनेच्या वेळी कॅनडामधील भारतीय नागरिकांशी अधिक चांगल्या प्रकारे संपर्क साधता येईल,' असा स्पष्ट उल्लेख अॅडव्हायझरीमध्ये आहे.