नवी दिल्ली: भारतीय सैन्याने पँगाँग लेक परिसरातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे LAC उल्लंघन केले, असा कांगावा करणाऱ्या चीनला भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. पश्चिम भागातील सीमारेषेवर निर्माण झालेला वाद शांततापूर्ण मार्गाने सोडवण्यावर भारत ठाम आहे. ३१ ऑगस्टला दोन्ही बाजूच्या सैन्याधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर चिनी सैन्याकडून आगळीक घडली. मात्र, भारतीय सैन्याने वेळेत उचललेल्या संरक्षणात्मक पावलांमुळे दोन्ही बाजूंनी सहमती असलेली परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न फोल ठरला. राजनैतिक आणि लष्करी पातळीवर आम्ही चिनी सैन्याच्या या प्रक्षोभक कृतीचा मुद्दा उपस्थित केला आहे. तसेच चीनने त्यांच्या आघाडीवरील सैन्याला अशाप्रकारचे प्रक्षोभक कृत्य टाळण्याच्यादृष्टीने नियंत्रणात ठेवावे, असेही सांगण्यात आल्याचे परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
भारत-चीन वाद: LAC वरील परिस्थितीचा अजित डोवल यांनी घेतला आढावा
Indian side is firmly committed to resolve all outstanding issues along the Line of Actual Control (LAC) in the Western Sector through peaceful dialogue: MEA https://t.co/EyXSKxe3v7
— ANI (@ANI) September 1, 2020
गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर पँगाँग लेकच्या परिसरातील घटनेमुळे भारत आणि चीन यांच्यातील तणाव पुन्हा शिगेला पोहोचला आहे. २९ आणि ३० ऑगस्टला रात्री चिनी सैन्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या परिसरातील 'ब्लॅक टॉप' ही टेकडी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. हा भाग चीनच्या ताब्यात गेला असता तर भारतीय लष्कराच्या चौक्या शत्रूच्या दृष्टीपथात आल्या असत्या. मात्र, भारतीय सैन्याने चिनी सैन्याचा हा प्रयत्न हाणून पाडला होता.