भारतात मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उघड, टिफीन बॉक्सद्वारे स्फोट घडवण्याचा कट

गुप्तचर यंत्रणांनी अलर्ट जारी केला असून पोलिसांना सतर्क राहण्यास सांगण्यात आलं आहे

Updated: Sep 23, 2021, 04:38 PM IST
भारतात मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उघड, टिफीन बॉक्सद्वारे स्फोट घडवण्याचा कट title=

मुंबई : भारतात मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट (Terror Attack) उघड झाला असून गुप्तचर यंत्रणांनी अलर्ट जारी केला आहे. दहशतवाद्यांचे मनसुबे उधळून लावण्यासाठी सुरक्षा यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. भारतावर हल्ला करण्यासाठी दहशतवादी पाकिस्तानातून (Pakistan) घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत, छोटे गट बनवून देशात घुसरीखोरी करण्याच्या तयारीत असल्याची माहितीही गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. 

गुप्तचर यंत्रणांनी दिला अलर्ट

गुप्तचर यंत्रणांनी अफगाण दहशतवाद्यांबाबतही अलर्टही जारी केला आहे. अफगाण दहशतवाद्यांबरोबरच लष्कर-ए-तैयबा (LET), हरकत-उल-अन्सार, हिजबुल मुजाहिद्दीन देखील हल्ल्याची तयारी करत असल्याची माहिती आहे. अफगाणिस्तानमधील (Afghanistan) बदललेल्या परिस्थितीनंतर पहिल्यांदाच गुप्तचर संस्थांनी अफगाण दहशतवाद्यांबाबत अलर्ट जारी केला आहे.

दहशतवाद्यांची जमवाजमव

पाकिस्तानच्या तहसील निकियाल सेक्टरच्या दहशतवादी छावणीत 35 ते 40 दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात आहेत. ज्यात लष्कर-ए-तैयबा, हरकत-उल-अन्सार आणि अफगाण दहशतवादींचा समावेश असल्याचं गुप्तचर संस्थांनी जारी केलेल्या अलर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. त्याचबरोबर, अशीही माहिती देण्यात आली आहे की LET आणि हरकत-उल-अन्सारच्या 4-5 दहशतवाद्यांनी POJK मधील निकियाल जिल्ह्यातील कथार भागात एका मार्गदर्शकाच्या घरी आश्रय घेतला आहे. दुसरीकडे, लष्करचे 5 दहशतवादी पाकिस्तानच्या पूंछ नदी (Poonch River), झलास परिसर आणि सलोत्री (Salotri) क्षेत्रामधून ट्यूब आणि स्नोर्कलिंग (Snorkelling-वॉटर-ब्रेथिंग ट्यूब) द्वारे नदीतून भारतात घुसण्याची तयारी करत आहेत.

सणांमध्ये स्फोटाचा कट

पाकिस्तानची एजन्सी आयएसआय (ISI) सणांमध्ये भारतात बॉम्बस्फोट घडवण्याची योजना आखत आहे, प्लास्टिक लंच बॉक्समध्ये स्फोटकं ठेवून गर्दीच्या ठिकाणी स्फोट घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा प्लान असल्याचा अलर्टही गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. ज्यासाठी दहशतवादी, साहित्य आणि पैसा सर्व तयार केलं गेलं आहे.

गुप्तचर यंत्रणांनी सर्व माहिती राज्य पोलिसांना दिली आहे. दहशतवादी हल्ले वेळीच थांबवण्यासाठी पोलिस आणि निमलष्करी दलांना सतर्क राहण्यास सांगण्यात आलं आहे.