बिहारमध्ये नेहमी चर्चेत असणारे आणि राज्यात 'सिंघम' नावाने प्रसिद्ध असणारे पोलीस अधिकारी शिवदीप वामनराव लांडे (Shivdeep Lande) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांची पूर्णिया आयुक्तालयाच्या आयजीपदी नियुक्ती करण्यात आली होती. यानंतर त्यांनी तेथील कार्यभारही स्विकारला होता. चार जिल्ह्यांमध्ये व्यसनाविरोधात कारवाई करणाऱ्या शिवदीप लांडे यांनी अचानक आपल्या अधिकृत फेसबुक पेजवरुन राजीनाम्याची घोषणा केली आहे.
शिवदीप लांडे यांनी अचानक राजीनामा दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान त्यांनी आपल्या राजीनाम्याचं कारण सांगितलं आहे. "मी वैयक्तिक कारणांमुळे भारतीय पोलीस दलातील नोकरीचा राजीनामा देत आहे", असं त्यांनी सांगितलं आहे.
दरम्यान याआधी केलेल्या आपल्या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, "माझे प्रिय बिहार, गेली 18 वर्षे सरकारी पदावर काम केल्यानंतर आज मी या पदाचा राजीनामा दिला आहे. एवढ्या वर्षात मी बिहारला माझ्या आणि माझ्या कुटुंबापेक्षाही जास्त मानलं आहे. सरकारी कर्मचारी असताना माझ्या कार्यकाळात काही चूक झाली असेल तर मी त्याबद्दल माफी मागतो. आज मी भारतीय पोलीस सेवेचा (आयपीएस) राजीनामा दिला आहे, पण मी बिहारमध्येच राहीन आणि भविष्यातही बिहार हेच माझे कार्यस्थान राहील".
शिवदीप लांडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून नोकरी सोडल्यानंतरही ते बिहारमध्ये राहणार असून, तीच कर्मभूमी असेल असं स्पष्ट केलं आहे. बिहार कॅडरचे आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे मूळचे महाराष्ट्राच्या अकोल्यातील आहेत. बिहारमधून प्रतिनियुक्तीवर मुंबईत गेल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र एटीएसमध्ये आयजी म्हणूनही काम केलं आहे.
अलीकडेच नितीश सरकारने शिवदीप लांडे यांची पूर्णिया आयुक्तालयात बदली करून त्यांची आयजी म्हणून नियुक्ती केली होती. सीमांचलमधून स्मॅकसारख्या ड्रग्जचा नायनाट करण्याची महत्त्वाची जबाबदारी त्यांना दिली होती. तेथे रुजू झाल्यानंतर शिवदीप लांडेही कारवाई करताना दिसले होते. पूर्णिया आयुक्तालयांतर्गत येणाऱ्या पूर्णिया, अररिया, कटिहार आणि किशनगंज या चार जिल्ह्यांत अंमली पदार्थ तस्करांवर कारवाई करण्यात ते व्यग्र होते.
आज सकाळी त्यांनी अचानक राजीनामा जाहीर केल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. शिवदीप लांडे यांचं बालपण अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत आणि गरिबीत गेले. प्रतिभावान शिवदीप लांडे यांनी शिष्यवृत्तीद्वारे अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर यूपीएससीत अव्वलही आले. त्यांना बिहार केडर मिळाले ज्यात ते 18 वर्षे IPS म्हणून कार्यरत होते.