Jammu Kashmir मध्ये संरक्षण दलाची मोठी कारवाई; पाहा नेमकं काय घडलं

सततची घुसखोरी , दहशतवादी कारवाया आणि...

Updated: Oct 12, 2021, 07:50 AM IST
Jammu Kashmir मध्ये संरक्षण दलाची मोठी कारवाई; पाहा नेमकं काय घडलं  title=
प्रतिकात्मक छायाचित्र

श्रीनगर : देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या जम्मू काश्मीर भागात असणारा तणाव दिवसागणिक वाढतच चालला आहे. सततची घुसखोरी, दहशतवादी कारवाया आणि स्थानिकांची दिशाभूल करण्याचे प्रकार इथं घडताना दिसत आहेत. त्यातच आता एका घटनेनं जम्मू काश्मीर पुन्हा देशाच्या पटलावर चर्चेत आलं आहे. (Jammu Kashmir)

मंगळवारी लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात संरक्षण दलांना यश मिळालं. पोलिसांकडून सैन्यदलाला याबाती माहिती देण्यात आली, ज्यानंतर करण्यात आलेल्या या कारवाईत दहशतवाद्यांकडून शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला. शोपियाँ भागात दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती मिळताच पोलीस आणि सैन्यदलानं मिळून सदर भागाला छावणीचं रुप देत शोधमोहिम राबवली. दहशतवादी लपून असणाऱ्या भागामध्ये अचानकच गोळीबार सुरु झाला आणि या कारवाईमध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलं.

तीनपैकी एक दहशतवादी हा गंदेरबल जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती काश्मीरचे पोलीस संचालक विजय कुमार यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिली. मुक्तार शाह असं त्याचं नाव असून, बिहारच्या एका विक्रेत्याला ठार केल्यानंतर तो शोपियाँमध्ये आला होता.

शोपियाँमधील इमामसाहब भागात असणाऱ्या तुलरान येथे ही कारवाई सुरु झाली होती. दरम्यान, सोमवारी पूँछ भागात दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीमध्ये 5 जवानांना वीरमरण आलं होतं. स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार या भागात सीमारेषेपलीकडून मोठ्या प्रमाणात सशस्त्र दहशतवद्यांनी घुसखोरी केली असून, ते मोठी कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे.