जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून मजुराची हत्या

हत्या करण्यात आलेला व्यक्ती छत्तीसगढमधील असल्याची माहिती मिळत आहे. 

Updated: Oct 16, 2019, 05:27 PM IST
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून मजुराची हत्या
संग्रहित फोटो

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये बुधवारी दहशतवाद्यांनी एका मजुराची हत्या केल्याची घटना घडली आहे. हत्या करण्यात आलेला व्यक्ती छत्तीसगढमधील असल्याची माहिती मिळत आहे. पुलवामातील काकपोरामध्ये दहशतवाद्यांनी हत्या केली. 

पोलीस आणि सुरक्षादलाकडून या संपूर्ण भागात घेराव घालण्यात आला आहे. परिसरात शोधमोहिम सुरु आहे. सेथी कुमार सागर असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून तो विट भट्टीमध्ये काम असल्याची माहिती मिळत आहे. 

याआधी सोमवारी रात्री ८ वाजता श्रीनगरच्या शोपिया भागातील सिंधु शेरमल परिसरात दहशतवाद्यांनी एका राजस्थानी ट्रक ड्रायव्हरची हत्या केली होती. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं की, ट्रक ड्रायव्हरच्या हत्येप्रकरणी १५ लोकांना चौकशीकरता ताब्यात घेतले आहे. जेव्हा सरफचंदांनी भरलेल्या ट्रकवर अज्ञातांनी हल्ला केला आहे. ड्रायव्हरची हत्या केल्यानंतर त्या ट्रकला आग लावण्यात आली.  या घटनेनंतर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.