close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

'तुमच्या वेतनासाठी कोणतीही बँक पैसे द्यायला तयार नाही'

२३ हजार कर्मचाऱ्यांचे भवितव्य टांगणीला

Updated: Apr 26, 2019, 07:52 PM IST
'तुमच्या वेतनासाठी कोणतीही बँक पैसे द्यायला तयार नाही'

नवी दिल्ली: जेटचा लिलाव होईपर्यंत कोणतीही बँक कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी पैसे द्यायला तयार नसल्याची माहिती समोर आली आहे. जेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विनय दुबे यांनी शुक्रवारी कर्मचाऱ्यांना याबद्दल सांगितले. त्यामुळे लिलाव प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच कर्मचाऱ्यांचे वेतन देता येईल, असे दुबे यांनी म्हटले. मात्र, वेतन मिळेलच याचीही पूर्ण शाश्वती देता येत नाही, असेही दुबे यांनी सांगितले. परिणामी जेटच्या कर्मचाऱ्यांची चिंता आणखीनच वाढली आहे. 

जेट एअरवेजची सेवा ठप्प झाल्यामुळे कंपनीच्या २३ हजार कर्मचाऱ्यांच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. यासाठी जेटचे कर्मचारी दिल्लीतही एकटवले होते. त्यांनी जेट एअरवेजचे पुनरुज्जीवन करण्याची मागणी केली होती. अनेक देशांतर्गत विमान कंपन्यांनी जेट एअरवेजच्या खरेदीत स्वारस्य दाखवले आहे. त्यामुळे लवकरच जेटचा लिलाव पार पडून कंपनीला देणी चुकती करता येतील, असा अंदाज आहे.

काही दिवसांपूर्वीच जेट एअरवेजच्या ५०० कर्मचाऱ्यांना स्पाईस जेटने आपल्या सेवेत सामावून घेतले होते. यामध्ये जेटचे १०० वैमानिक, २०० केबिन क्रू कर्मचारी आणि २०० तांत्रिक कर्मचाऱ्यांचा समावेश होता.  आगामी काळात आम्ही जेटच्या आणखी काही कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेऊ, असे आश्वासनही स्पाईस जेटने दिले आहे.

१७ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून जेट एअरवेजने आपली सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता.जेट एअरवेजचा कारभार सुरु ठेवण्यासाठी तब्बल ४०० कोटी रुपयांच्या निधीची गरज होती. त्यासाठी जेट नव्या गुंतवणूकदारांकडे आस लावून बसली होती. मात्र, कोणत्याही बँकेने अर्थसहाय्य न दिल्यामुळे अखेर जेटची सेवा ठप्प झाली होती.