वायुसेना अधिकाऱ्यांच्या हत्येचा आरोपी दहशतवादी जावेद मीरला अटक

वायुसेनेचे स्क्वाड्रन लीडर रवि खन्ना दहशतवादी हल्ल्यात आपल्या तीन साथीदारांसोबत शहीद झाले होते

Updated: Oct 18, 2019, 05:11 PM IST
वायुसेना अधिकाऱ्यांच्या हत्येचा आरोपी दहशतवादी जावेद मीरला अटक  title=

नवी दिल्ली : १९९० साली वायुसेना अधिकाऱ्यांची हत्या प्रकरणातील आरोपी दहशतवादी जावेद मीर उर्फ नलका याला अटक करण्यात आलीय. जावेद मीर याला २३ ऑक्टोबर रोजी कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे. पाक अधिकृत काश्मीर (पीओके) मध्ये हत्यार चालवण्याचं ट्रेनिंग घेणाऱ्या पहिल्या काही दहशतवाद्यांपैंकी जावेद मीर एक आहे. जावेद मीर हा फुटीरतावादी नेता यासीन मलिक याचा जवळचा मानला जातो. 

यासीन मलिक आणि त्याच्या साथीदारांवर २५ जानेवारी १९९० रोजी काश्मीरच्या सनत नगर भागात वायुसेनेच्या चार अधिकाऱ्यांची गोळ्या घालून हत्या करण्याचा आणि २२ जणांना जखमी करण्याचा आरोप आहे. वायुसेनेचे स्क्वाड्रन लीडर रवि खन्ना या दहशतवादी हल्ल्यात आपल्या तीन साथीदारांसोबत शहीद झाले होते. रवि खन्ना यांची पत्नी शालिनी खन्ना आजही ३० वर्षानंतर न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. 

या प्रकरणात सीबीआयनं ऑगस्ट १९९० मध्ये मलिक आणि त्याच्या साथीदारांविरोधात जम्मूच्या टाडा कोर्टात आरोपपत्र दाखल केलं होतं. परंतु, काश्मीरमध्ये टाडा कोर्ट नसल्यानं या प्रकरणाची सुनावणी जम्मूमध्ये होऊ शकणार नाही, असं सांगत जम्मू काश्मीर हायकोर्टच्या सिंगल बेन्चनं १९९५ मध्ये या सुनावणीला स्थगिती दिली होती. 

या प्रकरणात तब्बल ३० वर्षानंतर नुकत्याच गेल्या काही महिन्यांपूर्वी या प्रकरणाची सुनावणी करण्याची परवानगी मिळालीय. यासीन मलिक सध्य टेरर फंडिंग प्रकरणात एनआयएच्या ताब्यात तिहार तुरुंगात आहे. 

न्यायालयानं सीबीआयच्या वकिलांना मलिक याला ११ सप्टेंबर रोजी जम्मूच्या टाडा कोर्टात हजर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर हत्या प्रकरणात जम्मू टाडा कोर्टानं मंगळवारी फुटीरतावादी नेता यासीन मलिक याच्याविरुद्ध सुनावणी २३ ऑक्टोबरपर्यंत स्थगित केली. कोर्टानं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मलिक याला कोर्टासमोर हजर करण्याची परवानगी दिलीय.