कर्नाटकमधील राजकीय संघर्ष आता सर्वोच्च न्यायालयात

कर्नाटकमधील राजकीय संघर्ष  सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन पोहोचला आहे.  

ANI | Updated: Jul 10, 2019, 12:37 PM IST
कर्नाटकमधील राजकीय संघर्ष आता सर्वोच्च न्यायालयात

नवी दिल्ली : कर्नाटकमधील राजकीय संघर्ष आता सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन पोहोचला आहे. कर्नाटकचे काँग्रेस आणि जेडीएसचे बंडखोर आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. राजीनाम्यासंदर्भात बंडखोर आमदारांनी सर्वोच्च न्यायालय गाठले आहे. विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी राजीनामा स्वीकारण्यास उशीर केल्याचा आरोप या आमदारांनी केला आहे. सर्वोच्च न्यायालयात आता याप्रकरणी उद्या सुनावणी होणार आहे.

दरम्यान, मुंबईमध्ये असणारे काँग्रेसचे बंडखोर आमदार रमेश जारकीहोळी यांनी आज संध्याकाळपर्यंत आणखी चार आमदार मुंबईत पोहोचतील असा  दावा केलाय. जारकीहोळी यांच्या दाव्यानं पुन्हा एकदा राजकीय खळबळ उडालीय. मात्र हे आमदार कोण याची बंगळुरूत जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे आधीच संकटात सापडलेले कर्नाटकमधील जेडीएस-काँग्रेस मैत्री सरकार अधिक संकटात येऊ शकते, अशी शक्यता आहे.

तर दुसरीकडे कर्नाटकच्या बंडखोर आमदारांना मुंबईत कडेकोड सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आले आहे. दरम्यान, त्यांना कर्नाटकमधून भेटायला आलेले काँग्रेस ज्येष्ठ नेते डी. के. शिवकुमार यांना हॉटेलबाहेर पोलिसांनी रोखले. यावेळी शिवकुमार परत जा च्या घोषणा देण्यात आल्या. दरम्यान, हॉटेलमध्ये प्रवेश नाकारल्याने त्यांनी हॉटेल बाहेर ठिय्या मांडला. यावेळी पोलिसांनी त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, भाजपा नेत्यांना हॉटेलमध्ये कसा प्रवेश, असा सवाल शिवकुमार यांनी विचारला आहे.

कर्नाटक विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिलेले काँग्रेस आणि जेडीएसचे बंडखोर आमदार मुंबईच्या पवईमधल्या रेनेसन्स हॉटेलमध्ये गेल्या तीन दिवसांपासून तळ ठोकून आहेत. या नाराज आमदारांची मनधरणी करण्यासाठी काँग्रेसचे नेते डी. के. शिवकुमार हॉटेल परिसरात पोहोचले मात्र, त्यांना या आमदारांची भेट घेण्यापासून रोखण्यात आले. पोलिसांनी त्यांना हॉटेलमध्ये जाण्यास मज्जाव केला.

शिवकुमार यांनी पोलिसांना बुकिंगचं पत्र दाखवले. मात्र आतमध्ये सोडण्यास तयार नाहीत. यावेळी शिवकुमार यांच्या दौऱ्याचा विरोध करण्यासाठी हॉटेलवर जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. रेनेसन्स हॉटेलबाहेर शिवकुमार गो बॅकच्या घोषणा देण्यात आल्या. हॉटेलमध्ये जाऊ न देणे अयोग्य असून आपण केवळ हृदय घेऊन आलो आहोत. आयपीएस अधिकाऱ्याला सोबत येऊ द्या, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांनी दिली आहे.