Crime News : महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्या शिकवणीमुळे केरळमध्ये एका नराधमाला 100 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. केरळमध्ये (Kerala) साडेतीन वर्षांच्या मुलीच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणात आरोपीला 100 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा देण्यात महात्मा गांधींनी दिलेली सत्याचे अनुसरण करण्याची शिकवण महत्त्वाची ठरली आहे. दोन वर्षांपूर्वी घडलेल्या या प्रकरणात आरोपीला कोर्टानं (Kerala Court) कठोर शिक्षा सुनावली आहे. या निर्णयाची सध्या सगळीकडेच चर्चा सुरु झाली आहे.
पाठ्यपुस्तकात असलेली महात्मा गांधी यांची शिकवण साडेतीन वर्षांच्या मुलीच्या लैंगिक शोषणाच्या तपासात आणि आरोपीला 100 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा देण्यात महत्त्वाची ठरली आहे. दोन वर्षे जुन्या प्रकरणात, अदूर फास्ट ट्रॅक आणि पठाणमथिट्टा विशेष न्यायालयाने 11 ऑक्टोबर रोजी कोल्लम जिल्ह्यातील आरोपी विनोद याला 100 वर्षे सश्रम कारावास आणि 4 लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
महात्मा गांधी यांच्या शिकवणीमुळे आरोपी विनोदला ही शिक्षा मिळाली आहे. इयत्ता आठवीच्या पाठ्यपुस्तकात महात्मा गांधींबद्दलच्या धड्यामुळे ही भीषण घटना उघडकीस आली. पीडितेच्या आठ वर्षांच्या बहिणीने तिच्या आईला सांगितले की तिला आणि तिच्या लहान बहिणीला लैंगिक शोषणाचा सामना करावा लागला होता. तिच्या पाठ्यपुस्तकातील एका धड्यात 'कोणाशीही खोटे बोलू नका' हा गांधीजींचा धडा शिकल्यानंतर तिने आईला खरं सांगण्याचा निर्धार केला. मुलीच्या या धक्कादायक खुलाशानंतर पालकांनी अदूर पोलिसात तक्रार दाखल केली. महात्मा गांधी यांच्या धड्यामुळे या प्रकरणाचा तपास सुरू झाला आणि आता आरोपीला मोठी शिक्षा झाली आहे.
नेमकं काय घडलं?
माध्यमांच्या वृत्तानुसार, 18 डिसेंबर 2021 रोजी आरोपी विनोदने साडेतीन वर्षांच्या मुलीवर क्रूरपणे अत्याचार केला होता. एवढंच नाही तर आरोपीने पीडितेच्या ८ वर्षांच्या मोठ्या बहिणीवरही अत्याचार केले होते. या प्रकरणात ती प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होती. आठ वर्षाच्या मुलीने आई वडिलांना सगळा प्रकार सांगितल्यानंतर हे प्रकरण समोर आलं होतं. पोलिसांनी आरोपीला अटक करुन गु्न्हा दाखल केला होता. त्यानंतर आता बुधवारी न्यायाधीश ए. समीर यांनी आरोपीला पाच कलमांखाली 100 वर्षे कारावासाची शिक्षा सुनावत दंड देखील ठोठवला आहे. दंडाची रक्कम मुलींना दिली जाईल. दंड न भरल्यास त्याला दोन वर्षांचा अतिरिक्त कारावास भोगावा लागणार आहे.