रेल्वे स्थानकांवर पुन्हा मिळणार कुल्हडमधील चहा

पंतप्रधान मोदी सरकार एमएसएमई मंत्रालयाच्या पुढाकाराने जूने दिवस पुन्हा येणार आहेत.  

Updated: Nov 29, 2019, 11:16 AM IST
रेल्वे स्थानकांवर पुन्हा मिळणार कुल्हडमधील चहा title=

नवी दिल्ली : चहा हे भारतामधील सर्वाधिक प्यायले जाणारे पेय आणि प्रवासात हवा तसा चहा मिळाला तर मस्तचं. पंतप्रधान मोदी सरकार एमएसएमई मंत्रालयाच्या पुढाकाराने ते जूने दिवस पुन्हा येणार आहेत. आता तुम्हाला रेल्वे प्रवासादरम्यान कुल्हडमध्ये गरम-गरम चाहाची मजा घेता येणार आहे. बनारस आणि रायबरेली रेल्वे स्थानकांनंतर आता राजस्थानच्या २५ रेल्वे मोठ्या आणि महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर कुल्हडमधील चहाचा आनंद प्रवाश्यांना घेता येणार आहे.

बीकानेर, सिरसा, भिवानी, हनुमानगड, श्रीगंगानगर, हिसार, चूरू, सूरतगड, जोधपूर, पाली, बाडमेर, नागपूर, जैसलमेर, भगतची कोठी, लुनी, जयपूर, झुंझुन, दौसा, गांधी नगर, दुर्गापूर, सीकर, अजमेर, उदयपूर, सिरोही रस्ता, अबू रोड या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर कुल्हडमधील चहा मिळणार आहे. 

कुल्हडमधील चहा पुन्हा येण्यामागे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मुख्य भूमिका आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रेल्वे मंत्री पियूष गोयल यांना ४०० महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर हा प्रकल्प राबवण्याचा प्रस्ताव मांडला आहे. गडकरींच्या अंदाजे या प्रकल्पामुळे देशातील कुभारांना रोजगार मिळेल शिवाय रेल्वेच्या उत्पन्नात देखील वाढ होईल. 

रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी गडकरींच्या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवला आला आहे. सुरवातीला बनारस आणि रायबरेली येथे कुल्हडमधील चहा मिळायला सुरूवात झाली. त्यानंतर दोन्ही रोल्वे स्थानकांच्या अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अहवालानंतर ही योजना अन्य महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर देखील राबवण्यात येणार आहे.