पंतप्रधान मोदींचा उद्या पुन्हा मुख्यमंत्र्यांसोबत संवाद, लॉकडाऊनवर चर्चा

कोरोना व्हायरसचं वाढतं संक्रमण आणि लॉकडाऊनबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी सर्व मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार आहेत.

Updated: May 10, 2020, 05:59 PM IST
पंतप्रधान मोदींचा उद्या पुन्हा मुख्यमंत्र्यांसोबत संवाद, लॉकडाऊनवर चर्चा title=

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचं वाढतं संक्रमण आणि लॉकडाऊनबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी सर्व मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार आहेत. दुपारी ३ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पंतप्रधान मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधतील. देशात कोरोनाचा फैलाव झाल्यानंतर पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांची ही पाचवी बैठक असेल. 

पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांसोबतच्या या बैठकीमध्ये अर्थव्यवस्थेवर चर्चा होऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी तसंच रेड झोनला ऑरेंज झोनमध्ये, ऑरेंज झोनला ग्रीन झोनमध्ये आणण्याबाबत चर्चा होईल. १७ मे रोजी तिसरा लॉकडाऊन संपणार आहे, त्यामुळे आर्थिक उलाढाली वाढवण्यासाठी आणि कंटेनमेंट झोनमधील परिस्थिती सुधारण्याबाबतही बैठकीत बोललं जाईल.

पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या या बैठकीआधी प्रधान सचिव राजीव गौबा यांनी कोरोनाला रोखण्यासाठी आणि देशातल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सगळ्या राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिव आणि आरोग्य सचिवांसोबत बैठक घेतली होती.