शिर्डी मतदार संघात तिरंगी लढत, राजकीय वातावरण तापले

 शिर्डी मतदारसंघातील राजकीय वातावरण तापल्याचे दिसू लागले आहे.

Updated: Apr 26, 2019, 11:10 AM IST
शिर्डी मतदार संघात तिरंगी लढत, राजकीय वातावरण तापले  title=

शिर्डी : अहमदनगर लोकसभा निवडणुकीचे मतदान आटोपल्यावर युती आघाडीचे नेते आणि कार्यकर्त्यांनी आता शिर्डीकडे मोर्चा वळवला आहे. या मतदारसंघाची निवडणूक २९ एप्रिलला होत आहे. तेथील प्रचाराची सांगता उदया शनिवारी सायंकाळी होणार आहे. त्यामुळे शेवटच्या दोन दिवसात शिर्डीचे वातावरण तापवण्याचे नियोजन दोन्हीकडून सुरू आहे. त्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सभेनंतर आता शिर्डी आणि नाशिक लोकसभा मतदार संघाच्या आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी कॉग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांची संगमनेरला सभा होतेय तर युतीच्या उमेदवारांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभा श्रीरामपुरात होणार आहेत. त्यामुळे शिर्डी मतदारसंघातील राजकीय वातावरण तापल्याचे दिसू लागले आहे.

आतापर्यंतच्या निवडणुकांतून नगर आणि शिर्डी मतदारसंघाच्या निवडणुका एकाच दिवशी होत असल्याने दोन्हीकडे जाहीर सभा, प्रचार फेऱ्यांचा धुराळा उडत असे. पण यंदा प्रथमच या दोन्ही निवडणुका वेगवेगळ्या तारखांना होत असल्याने राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांना तसेच समर्थकांनाही दोन्हीकडील प्रचार नियोजनाला पुरेसा वेळ मिळाला. युती आणि काँग्रेस आघाडीसह अन्य पक्षांकडूनही आधी नगर मतदारसंघाच्या प्रचार नियोजनाला महत्व दिले गेले. त्यानंतर आता येथील मतदान आटोपल्याने शिर्डीचे प्रचार नियोजन हाती घेतले गेले आहे. नगरचे मतदान झाल्यानंतर दक्षिण नगर जिल्ह्यातील युती, आघाडीचे नेते, कार्यकर्ते शिर्डीत सक्रीय झाले आहेत आता  हाताशी वेळ कमी असल्याने सगळ्यांचीच धावपळ जोरात सुरू आहे.

तिरंगी लढतीमुळे उत्सुकता :

शिर्डीमध्ये शिवसेनेकडून सदाशिव लोखंडे, काँग्रेसकडून आमदार भाऊसाहेब कांबळे या दोन प्रमुख पक्षीय उमेदवारांसह अपक्ष उमेदवार माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरेही रिंगणात आहेत. याशिवाय वंचित बहुजन आघाडीचे संजय सुखदान व अन्य १६ उमेदवारही रिंगणात असले तरी खरी लढत लोखंडे-कांबळे-वाकचौरे अशी तिरंगी मानली जात आहे. लोखंडेंसाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली आहे. भाजपने नगरमध्ये युतीकडून डॉ. सुजय विखेंना उतरवले असल्याने आता नगर शहर आणि दक्षिण जिल्ह्यातील भाजप-शिवसेनेची ताकद तसेच उत्तर नगर जिल्ह्यातील विखेंच्या यंत्रणेची ताकद शिर्डीमध्ये शिवसेनेसाठी एकत्रित काम करणार असल्याचे दिसुन येतेय.

राधाकृष्ण विखे स्वत: आता मतदार संघात फिरत सेनेच्या उमेदवारासाठी मोर्चे बांधणी करत आहेत. विखेंच्यासह युतीला टक्कर देण्यासाठी आमदार बाळासाहेब थोरात आणि  त्यांच्या समर्थकांनी कंबर कसली आहे. खुद्द थोरातांनी मतदारसंघ पिंजून काढला आहे. श्रीरामपुरातील बुहचर्चित ससाणे-मुरकुटे-आदिक यांच्यातील गटबाजी शमविण्यात त्यांना यश आल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर लोखंडे आणि कांबळेंची लढत दोन्हींकडून प्रतिष्ठेची बनली आहे.

शिवसेनेच्या लोखंडेंसाठी कोपरगावच्या भाजपच्या आमदार स्नेहलता कोल्हे , नेवाशाचे बाळासाहेब मुरकुटे यांच्यासह राहाता-शिर्डी-लोणी परिसरातील विखेंची यंत्रणा असल्याचे सांगितले जाते. लोखंडेंविरुद्ध अपक्ष उमेदवारी करून बंडखोरी केल्याने भाजपने माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर हकालपट्टीची कारवाईही करून युती धर्म पाळल्याचेही स्पष्ट केले जात आहे. तर दुसरीकडे कांबळेंसाठी अकोल्यातील राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड, संगमनेरचे आमदार थोरात तसेच श्रीरामपूर येथील  मुरकुटे , आदिक गट सक्रिय झाला आहे  याशिवाय खुद्द उमेदवार आमदार कांबळे यांचे येथील समर्थकही मदतीला आहेत. मात्र, नेवाशातील यशवंतराव गडाख समर्थकांच्या पावित्र्याची उत्सुकता आहे. या पार्श्वभूमीवर आता ठाकरे, पवारांपाठोपाठ  गांधी आणि फडणवीस यांच्या सभा होत असल्याने शिर्डीचे वातावरण ढवळून निघाले आहे.