नागरिकत्वाच्या मुद्यावर राहुल गांधींना गृहमंत्रालयाची नोटीस

राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशच्या अमेठी आणि केरळच्या वायनाड येथून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे

Updated: Apr 30, 2019, 12:10 PM IST
नागरिकत्वाच्या मुद्यावर राहुल गांधींना गृहमंत्रालयाची नोटीस title=

नवी दिल्ली : काँग्रेसचे सरचिटणीस आणि अमेठीचे उमेदवार राहुल गांधी यांना नागरिकत्वच्या मुद्द्यावर गृहमंत्रालची नोटीस धाडलीय. भारतीय जनता पक्षाचे नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर गृहमंत्रालयानं ही नोटीस धाडलीय. 'या मुद्यावर सत्यपरिस्थितीत सादर करावी' असं सांगत गृहमंत्रालयानं या नोटीशीला उत्तर देण्यासाठी राहुल गांधी यांना १५ दिवसांचा अवधी दिला आहे. राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाचा मुद्दा या निवडणुकीत ऐरणीवर आणण्यात आला आहे. अमेठीतल्या  चार अपक्ष उमेदवारांनी या संदर्भात याआधीच सत्र न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर न्यायालयात राहुल गांधी यांच्या वकिलांनी बाजू मांडली होती. त्यानंतर राहुल यांची उमेदवारी वैध ठरली. आता खासदार स्वामी यांनी पुन्हा एकदा हा मुद्दा गृहमंत्रालयात नेलाय. स्वामी यांच्या चौदा पानी तक्रारीवरून ही नोटीस बजावण्यात आलीय. 


गृहमंत्रालयाची राहुल गांधींना नोटीस

 

आपण बॅकऑफ्स लिमिटेड कंपनीत गुंतवणूक केल्याची माहिती राहुल गांधींनी २००४ च्या निवडणूक शपथपत्रात दिली आहे. या कंपनीच्या कागदपत्रांमध्ये राहुल गांधी हे ब्रिटनचे नागरिक असल्याचा उल्लेख आहे, असा भाजपनं आरोप केला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ब्रिटनचे नागरिकत्व घेतले होते. याच कारणामुळे त्यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी, अशी तक्रार अमेठी लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार ध्रुव लाल यांचे वकील रवी प्रकाश यांनी रिटर्निंग अधिकाऱ्याकडे केली होती. एखादी भारतीय व्यक्ती दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलं तर त्या व्यक्तीचं भारतीय नागरिकत्व समाप्त होतं. नागरिकत्व समाप्त झाल्यानंतर ती व्यक्ती भारतात निवडणूक लढवू शकत नाही, असं म्हणत भाजपानं राहुल गांधी यांच्या निवडणूक अर्जावर आक्षेप घेतला होता.

 

राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशच्या अमेठी आणि केरळच्या वायनाड येथून उमेदवारी अर्ज दाखल केला. पण राहुल यांच्या नागरिकत्वावर एका अपक्ष उमेदवाराने प्रश्नचिन्ह उपस्थित करत यासंदर्भात तक्रार दाखल केली. राहुल यांच्याकडे भारत आणि ब्रिटन अशा दोन देशांचे नागरिकत्व असल्याचा दावा करण्यात आला होता. परंतु, हा दावा फेटाळात अमेठीतील परतावा अधिकाऱ्यांनी काँग्रेस अध्यक्षांची उमेदवारी वैध ठरवली होती.