दिल्लीत आज प्रियंका गांधी - नरेंद्र मोदी आमने-सामने

दिल्लीच्या ऐतिहासिक रामलीला मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी जनसभेला संबोधित करणार आहेत

Updated: May 8, 2019, 09:40 AM IST
दिल्लीत आज प्रियंका गांधी - नरेंद्र मोदी आमने-सामने title=

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीत बुधवारी ८ मे रोजी सर्वात मोठी 'दंगल' दिसणार आहे. लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजताच दिल्लीत प्रचाराला सुरुवात झाली होती... परंतु बुधवारी या प्रचाराला खरी धार येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वाड्रा एकाच दिवशी दिल्लीत आपापल्या पक्षाच्या प्रचारासाठी रस्त्यांवर उतरणार आहेत. दिल्लीत आज पंतप्रधानांची रॅली आयोजित करण्यात आलीय तर प्रियंका गांधीही रोड शोमध्ये सहभागी होणार आहेत.

पंतप्रधान मोदींची रॅली

दिल्लीच्या ऐतिहासिक रामलीला मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी जनसभेला संबोधित करणार आहेत. मोदींची रॅली सायंकाळी पाच वाजल्यानंतर आयोजित करण्यात आलीय. या रॅलीत मुस्लीम बांधवही मोठ्या संख्येनं सहभागी होणार असल्याची शक्यता भाजप नेते व्यक्त करत आहेत. याशिवाय अनेक व्यावसायिक आणि तरुणही यात सहभागी होतील. पंतप्रधानांची ही रॅली यशस्वी बनवण्यासाठी नोएडा, गाझियाबाद, गुडगाव, फरीदाबाद यांसारख्या भागांतून रामलीला मैदानापर्यंत गाड्या आणण्याची व्यवस्था करण्यात आलीय. 

पंतप्रधानांच्या भाषणासाठी मोठ मोठे स्क्रीन रामलीला मैदानात लावण्यात आले आहेत. शहराची ट्राफीक व्यवस्थेवर या रॅलीचा परिणाम टाळण्यासाठी रामलीला मैदानाकडे जाणाऱ्या रस्त्यांवरची वाहतूक वळवण्यात आलीय.

प्रियंका गांधींचा रोड शो

काँग्रेसच्या प्रचारक प्रियंका गांधीही पहिल्यांदाच दिल्लीच्या रस्त्यांवर मतं मागण्यासाठी बाहेर पडणार आहेत. प्रियंका बुधवारी सायंकाळी ४ वाजता उत्तर - पूर्व दिल्लीत शीला दीक्षित यांच्यासाठी तर सायंकाळी ६ वाजता दक्षिण दिल्लीत बॉक्स विजेंदरसाठी प्रचार करणार आहेत. 

दिल्लीत लोकसभेचे सात मतदारसंघ आहेत. या ठिकाणी १२ मे रोजी मतदान होणार आहे. भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पार्टी स्वतंत्ररित्या आपापलं बळ या निवडणुकीच्या निमित्तानं आजमावून पाहत आहेत.