अमेठीत राहुल गांधींना पुन्हा टक्कर देणार स्मृती इराणी

भाजपकडून पुन्हा एकदा स्मृती इराणींना उमेदवारी

शैलेश मुसळे | Updated: Apr 1, 2019, 04:58 PM IST
अमेठीत राहुल गांधींना पुन्हा टक्कर देणार स्मृती इराणी title=

नवी दिल्ली : भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केली. ज्यामध्ये अनेर विद्यामान खासदारांचा पत्ता कापण्यात आला आहे. तर या यादीत काही अशीही नावे आहेत ज्यांना २०१४ नंतर भाजप पुन्हा एकदा मैदानात उतरवत आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री स्‍मृती इराणी यांचं देखील नाव आहे. २०१४ मध्ये त्यांनी अमेठीमधून निवडणूक लढवली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा राहुल गांधी आणि स्मृती इराणी यांच्यात येथे टक्कर पाहायला मिळणार आहे.

स्‍मृती इराणी यांना गांधी घराण्याचा गड मानला जातो अशा ठिकाणी पुन्हा एकदा उमेदवारी देण्य़ात आली आहे. २०१४ मध्ये स्मृती इराणी यांचा पराभव झाला होता. पण त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना येथे चांगलीच टक्कर दिली होती. २००९ मध्ये राहुल गांधी यांचा अमेठीमधून ३.७० लाख मताच्या फरकाने विजय झाला होता. तर २०१४ मध्ये त्यांचा १.७ लाख मतांच्या फरकाने विजय झाला होता.

स्‍मृती इराणी यांचा अमेठीमधून पराभव झाल्यानंतरही त्यांनी येथे संपर्क ठेवला आहे. काँग्रेस विरुद्ध त्यांची टीका सुरु आहे. मागील ५ वर्षात त्यांनी अनेकदा अमेठीचा दौरा केला आहे. विकासाच्या मुद्द्यावर त्यांना राहुल गांधींना बऱ्याचदा घेरलं आहे.

यूपीमधील अमेठी मतदारसंघ हा गांधी घराण्याचा गड आहे. १९७७-१९८० आणि १९९८-१९९९ हा कालावधी सोडला तर येथे काँग्रेस उमेदवाराचाच विजय झाला आहे. देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी १९८१ ते १९९१ दरम्यान येथूनच निवडून जात होते. राहुल गांधी यांनी २००४ मध्ये पहिल्यांदा येथून निवडणूक लढवली. त्याआधी सोनिया गांधी यांनी येथून निवडणूक लढवली. सोनिया गांधी या सध्या रायबरेलीमधून खासदार आहेत.