Loksabha Election 2024 BJP First Candidate List Gautam Gambhir: दिल्लीतील लोकसभा निवडणुकीसंदर्भात भारतीय जनता पार्टीने अगदी सावध पवित्रा घेतला आहे. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने काँग्रेसबरोबर आघाडी केल्याने उमेदवार देताना कोणतीही चूक करण्याची भाजपाची इच्छा नसून यामुळेच ते अधिक सावध झाले आहेत. संभाव्य उमेदवारांची यादी भाजपाने तयार करण्यास सुरुवात केली आहे. यासंदर्भात वेगवेगळ्या बैठका पार पडत आहेत. भाजपाकडून उमेदवारांची पहिली यादी लवकरच जाहीर केली जाईल अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आज (29 फेब्रुवारी 2024 रोजी) सायंकाळी होऊ शकते असा एक अंदाज व्यक्त केला जात आहे. दिल्लीमधून 7 जागांसाठी 28 उमेदवारांची चर्चा आहे.
बुधवारी दिल्लीतील 7 जागांसंदर्भातील मतं आणि सर्वेची आकडेवारी भाजपाने गोळा करण्यास सुरुवात केली आहे. दिल्लीतील काही विद्यमान खासादरांचं तिकीट कापलं जाऊ शकतं अशी दाट शक्यता आहे. काही दिवसांमध्ये नवीन उमेदवारांच्या नावांची घोषणा होऊ शकते असंही म्हटलं जात आहे. मात्र या सर्व चर्चेदरम्यान विद्यमान खासदार गौतम गंभीरचं तिकीट कापलं जाईल अशी शक्यता आहे.
दिल्ली भाजपाने वरिष्ठांना काही उमेदवारांची नावं पाठवली आहेत. आठवड्याभरात पहिली यादी जाहीर होईल अशी शक्यता आहे. भाजपाचे सर्व राज्यप्रमुख भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत. नड्डांच्या नेतृत्वाखालीच सर्व राज्य प्रमुखांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत 28 जणांच्या नावाची चर्चा आहे. दिल्लीतील एका वरिष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील प्रमुखांनी संभाव्य उमेदवारांची यादी केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: या बैठकीचं नेतृत्व करणार आहे. त्यामुळे या बैठकीत नावं निश्चित होतील असं मानलं जात आहे.
नवी दिल्लीमधील चांदणी चौक मतदारसंघातून अभिनेता अक्षय कुमारला तिकीट दिलं जाऊ शकतं अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या मतदारसंघामध्ये अक्षय कुमारबरोबरच माजी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन, विष्णू मित्तल आणि विजेंद्र गुप्ता यांच्या नावांचीही संभाव्य उमेदवारांमध्ये समावेश आहे. या निवडणुकीमध्ये चांदणी चौक मतदारसंघातून जे. पी. अग्रवाल किंवा संदीप दीक्षित निवडणूक लढू शकतात. अक्षय कुमारला पूर्व दिल्ली मतदारसंघातूनही निवडणुकीत उतरवलं जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नक्की वाचा >> LokSabha: महाराष्ट्राच्या कोणत्या मुख्यमंत्र्याचं काम सर्वात चांगलं? लोकांनी 'या' नावाला दिली भरभरुन मतं
पूर्व दिल्लीमधून सध्या माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर खासदार आहे. मात्र गंभीरचं नाव संभाव्य उमेदवारांमध्ये नसल्याचं समजतं. या मतदारसंघातून भाजपाकडून हर्ष मल्होत्रा, कुलजीत सिंह चहल, अक्षय कुमारच्या नावाची चर्चा आहे. भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागने यापूर्वीच आपण राजकारणात येणार नसल्याचं जाहीर केलं असलं तरी लोकसभा निवडणुकीमध्ये संभाव्य उमेदवारांमध्ये त्याच्या नावाची चर्चा आहे. सेहवागला गृहराज्यातून तिकीट दिलं जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.