गांधी परिवाराचं 100 वर्षांचं नातं,राहुल गांधींची भावनिक साद; भाजपचं टेन्शन वाढणार?

Rahul Gandhi Rae Bareli : . रायबरेली लोकसभा रणसंग्रामाच्या विजयासाठी राहुल गांधी आणि काँग्रेसने एक अनोखी रणनीती आखलीय. 

Pravin Dabholkar | Updated: May 15, 2024, 07:10 PM IST
गांधी परिवाराचं 100 वर्षांचं नातं,राहुल गांधींची भावनिक साद; भाजपचं टेन्शन वाढणार? title=
Rahul Gandhi Rae Bareli

Rahul Gandhi Rae Bareli : रायबरेली येथे 1952 आणि 1960 - फिरोज गांधी विजयी, 1967, 1971 आणि 1980 - इंदिरा गांधी विजयी, 2004 पासून 2019 पर्यंत - सोनिया गांधी विजयी झाल्या. आता रायबरेली पुन्हा जिंकण्याचे कॉंग्रेसचे लक्ष्य आहे. रायबरेली लोकसभा रणसंग्रामाच्या विजयासाठी राहुल गांधी आणि काँग्रेसने एक अनोखी रणनीती आखलीय. 

रायबरेली आणि गांधी परिवाराचं गेल्या 100 वर्षांचं नातं सांगणारा एक व्हिडिओ राहुल गांधींनी ट्विट केलाय. या व्हिडिओमध्ये राहुल गांधी रायबरेली आणि अमेठीच्या नात्याबद्द्ल सोनिया गांधींशी चर्चा करताना दिसतायत. राजीव गांधींच्या फोटोंचा अल्बम चाळता चाळता त्यांनी केलेल्या विकासाबद्दल दोघंही गप्पा मारताना दिसतायत..

रायबरेली आणि अमेठी आमच्यासाठी एक निवडणूक क्षेत्र नाही. तर कर्मभूमी आहे. जिथे पिढ्यान पिढ्यांच्या आठवणी साठल्या आहेत. आईसोबतचे जुने फोटो पाहून वडील आणि आजीची आठवण आली. त्यांनी सुरु केलेली सेवेची परंपरा मी आणि आईने पुढे चालवली, असे राहुल गांधी सांगतात. 

या गप्पा सुरू असतानाच सोनिया गांधी यांनी आपल्या पहिल्या रायबरेली दौऱ्याच्या आठवणीही जाग्या केल्या. कधी वडिलांची आठवण.. कधी आजी आणि पणजोबांच्या स्मृतींना उजाळा.. गांधी घराणं आणि रायबरेलीचं नातं यातून सांगण्याचा प्रयत्न केला गेलाय. राहुल गांधी यांनी या व्हिडिओमध्ये आजोबा फिरोज गांधी, पणजोबा पंडित नेहरू यांच्यापासून ते आजी इंदिरा गांधींच्या कार्याचाही उल्लेख केलाय. प्रेम आणि विश्वासाच्या पायावर उभ्या असलेल्या 100 वर्षाहून जुन्या नात्याने आम्हाला सर्वकाही दिलंय. आता अमेठी आणि रायबरेली आम्हाला कधी हाक मारतील आम्ही तिथे भेटू, असे राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. 

तर सोनिया गांधींनी आपल्या खासदारकीच्या कार्यकाळात केलेल्या कामांचाही आढावा या व्हिडिओमधून घेतला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण उत्तर प्रदेशात केवळ रायबरेलीची जागा काँग्रेसनं जिंकली होती. मोदी लाटेत अमेठीत राहुल गांधींचा पराभव झाला... मात्र रायबरेलीचा बालेकिल्ला सोनिया गांधींनी राखला. यंदा राहुल गांधी रायबरेलीमधून लोकसभेच्या रिंगणात आहेत.. त्यामुळे गांधी कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला लागलीय. 

रायबरेलीमध्ये येत्या 20 मे रोजी मतदान होणाराय.. आणि त्यामुळे काँग्रेस रायबरेलीच्या जनतेसोबत भावनिक नाळ जोडण्याचा प्रयत्न करताना दिसतेय.. यामध्ये ते यशस्वी होतात का हे आता निकालानंतरच स्पष्ट होईल.