ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांचा भाजपात प्रवेश

ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांनी भाजपात प्रवेश केला आहे. देशात लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजत असताना अनुराधा पौडवाल यांनी भाजपाचं कमळ हाती घेतलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Mar 16, 2024, 02:30 PM IST
ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांचा भाजपात प्रवेश title=

ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांनी भाजपात प्रवेश केला आहे. देशात लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजत असताना अनुराधा पौडवाल यांनी भाजपाचं कमळ हाती घेतलं आहे. दिल्लीतील भाजपा कार्यालयात दुपारी 1 वाजून 15 मिनिटांनी त्यांचा पक्षप्रवेश पार पडला. अनुराधा पौडवाल भाजपात अशावेळी दाखल झाल्या आहेत, जेव्हा देशात निवडणुकीचं वातावरण आहे. आज निवडणूक आयोग लोकसभा आणि चार राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा करणार आहे. 

कोण आहेत अनुराधा पौडवाल?

अनुराधा पौडवाल प्रसिद्ध गायिका आहे. 90 व्या दशकात बॉलिवूड तसंच भक्तीगीतांनी त्यांनी चाहत्यांच्या मनावर अधिराज्य केलं होतं. त्या 69 वर्षांच्या आहेत. 

27 ऑक्टोबर 1952 रोजी कर्नाटकात त्यांचा जन्म झाला. 1973 मध्ये त्यांच्या करिअरला सुरुवात झाली. त्यांनी सर्वात आधी अभिमान चित्रपटात एक श्लोक गायला होता. 1973 मध्येच त्यांनी 'यशोदा' चित्रपटातून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. एक वर्षांनी त्यांनी अमराटी गाणी गाण्यास सुरुवात केली. 

1984 मध्ये हिरो चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्काराचं नामांकन मिळालं होतं. 1986 मध्ये उत्सव चित्रपटातील मेरा मन बाजा मृदंग गाण्यासाठी त्यांना पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. आपल्या इतक्या मोठ्या करिअरमध्ये त्यांनी हिंदी, कन्नड, राजस्थानी, मराठी, संस्कृत. गुजराती, तामिळ, तेलुगू, पंजाबी, भोजपुरी, नेपाळी आणि मैथिलीसह अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. त्यांनी तब्बल 1500 भजनं गायली आहेत. 

1969 मध्ये अरुण पौडवाल यांच्याशी त्यांचं लग्न झालं होतं. अरुण पौडवाल हे एस डी बर्मन यांचे असिस्टंट आणि संगीतकार होते. त्यांना आदित्य आणि कविता अशी दोन मुलं आहेत. आदित्यचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला आहे. तसंच 1991 मध्ये त्यांच्या पतीचं निधन झालं. 

लाऊडस्पीकरवरील अजानवर उपस्थित केलं होतं प्रश्नचिन्ह

अनुराधा पौडवाल यांनी एप्रिल 2022 मध्ये लाऊडस्पीकरवर होणाऱ्या अजानवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. मी परदेशात अनेक ठिकाणी फिरली असून, कुठेच असं होताना पाहिलेलं नाही. फक्त भारतातच असतं होतं. भारतात याला विनाकारण पाठबळ दिलं जातं. मशिदींमध्ये लाऊडस्पीकरवर अजान करतात, ज्यामुळे इतर लोकही स्पीकर वापरतात असं त्या म्हणाल्या होत्या. मिडिल ईस्टमध्ये लाऊडस्पीकरवर अजानला बंदी आहे. जर मुस्लिम देशांमध्येच लाऊडस्पीकर वापरला जात नाही तर भारतात असं का होतं? अशी विचारणाही त्यांनी केली होती.