फिरोजाबाद : समाजवादी पार्टीचे ज्येष्ठ नेते रामगोपाल यादव यांनी पुलवामा हल्ल्यावर वादग्रस्त विधान केले आहे. 14 फेब्रुवारीला सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेला हल्ला हे एक षढयंत्र असून मतं मिळवण्यासाठी हा हल्ला घडवल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यावर पलटवारही केला आहे. केंद्रात जर सरकार बदलले तर या हल्ल्याची चौकशी केली जाईल आणि यामध्ये मोठमोठ्या लोकांची नावे बाहेर येतील असे रामगोपाल म्हणाले. होळीच्या निमित्ताने यादव जनतेला संबोधित करत होते. मतं मिळवण्यासाठी जवानांना मारले गेले. जम्मू आणि श्रीनगर दरम्यान हायवेवर कोणतीही तपासणी नव्हती. सीआरपीएफ जवानांना साधारण बसने पाठवले गेले. हे सर्व षढयंत्राचा भाग असल्याचा आरोप रामगोपाल यांनी केला. मी आता यावर अधिक बोलणार नाही. पण सरकार बदलले तर या प्रकरणाची चौकशी होईल आणि मोठमोठी नावे बाहेर येतील असे रामगोपाल म्हणाले.
सपा नेते रामगोपाल यादव यांच्या वक्तव्यावर योगी आदित्यनाथ यांनी जोरदार टीका केली आहे. रामगोपाल यांचे वक्तव्य म्हणजे घाणेरड्या राजकारणाचे उदाहरण असल्याचे योगी म्हणाले. सीआरपीएफ जवान शहीद होण्यावर प्रश्न उपस्थित करणे आणि जवानांचे मनोबल तोडणाऱ्या या वक्तव्याबद्दल त्यांनी जनतेची माफी मागितली पाहीजे असेही योगींनी म्हटले आहे.
14 फेब्रुवारीला जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर आत्मघाती हल्ला केला. यामध्ये 40 जवान शहीद झाले होते. याच्या 13 दिवसांतच भारतीय वायुसेनेने पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक करत 'जैश'च्या ठिकाणांवर हल्ला केला.