LPG Gas Cylinder Price: घरगुती गॅसच्या वाढणाऱ्या किंमती या सर्वासामान्यांना महागाईची झळ सोसायला लावणाऱ्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टींपैकी एक आहे. मागील बऱ्याच काळापासून सातत्याने गॅस सिलेंडरचे दर (LPG Gas Cylinder Rate) टप्प्याटप्यात वाढले आहेत. त्यामुळे गॅस सिलेंडरचे दर कमी करावेत अशी मागणी होत आहे. खरोखरच सिलेंडरचे दर कमी झाले तर सर्वसामान्यांना मोठा दिसाला मिळेल. याचदरम्यान घरगुती गॅस संदर्भातील एक मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्री हरदीप सिंह पुरी (Petroleum Minister Hardeep Puri) यांनी गुरुवारी गॅसच्या किंमती कमी होण्यासंदर्भातील विधान केलं आहे. जर इंधनाच्या किंमती आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कमी झाल्या तर एलपीसी सिलेंडरचे दर कमी होईल असं पुरी यांनी म्हटलं आहे.
पुरी यांनी इंधनाचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील दर सध्याच्या म्हणजेच 750 डॉलर प्रति मेट्रीक टनपेक्षा कमी झाले तर घरगुती एलपीजी सिलेंडर 'अधिक स्वस्त दरांमध्ये' विकता येतील असं म्हटलं आहे. लोकसभेमध्ये गुरुवारी प्रश्नोत्तरच्या वेळी घरगुती गॅस सिलेंडरसंदर्भात अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यावर सरकारच्यावतीने पेट्रोलियम पुरी यांनी सिलेंडरची किंमतींसंदर्भात सविस्तर उत्तर दिलं. गॅस सिलेंडरची किंमत आंतरराष्ट्रीय किंमतीवर आकारल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या करांवर आधारित असते, असं पुरी यांनी लोकसभेमधील प्रश्नांना उत्तर देताना सांगितलं.
लोकसभेमध्ये घरगुती एलपीजीच्या किंमतींबद्दल डीएमकेचे खासदार कालानिधी वीरास्वामी यांच्या प्रश्नाला उत्तर देताना पुरी यांनी सरकार वापरकर्त्याच्या गरजांबद्दल संवेदनशील असल्याचं म्हटलं. खास करुन गरीब वर्गातील लोकांबद्दल सरकार संवेदनशील असल्याचा उल्लेखही पुरी यांनी केला. पुरी यांनी घरगुती वापरासाठीची एलपीजी सिलेंडर (14.2 किलोग्रॅम) ची किरकोळ विक्री किंमत (आरएसपी) दिल्लीमध्ये 1053 रुपये इतकी आहे.
सौदी अरेबियाने गॅसच्या दरांमध्ये 330 टक्क्यांहून अधिक वाढ केली आहे. मात्र सरकारने त्या तुलनेत गॅसचे दर वाढवलेले नाहीत. त्यामुळे सौदी अरेबियाने गॅसच्या किंमती कमी केल्यास त्याचा परिणाम देशातील एलपीजी सिलेंडरच्या दरांवर होईल.
पूर्वी प्रत्येक व्यक्तीला गॅस सिलेंडर सबसिडी दिली जायची. मात्र आता गॅस सिलेंडरवरील सबसिडी पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. मात्र पुन्हा ही सबसिडी सुरु केल्यास त्याचा लाभ आधी गरीब लोकांना दिला जाईल, असं सांगण्यात येत आहे.