लखनऊ : MP Police gift Bike to Delivery Boy: सध्या उन्हाचा तडाखा जाणवत आहे. उष्णतेच्या लाटेमुळे सगळेच हैराण झाले आहेत. फूड डिलिव्हरी करताना एका कंपनीचा डिलिव्हरी बॉय घामाने डबलेला होता. त्याची ही अवस्था एका पोलीस कर्मचाऱ्याला पाहावली नाही. पोलीस कर्मचाऱ्यांच्या हृदयाला पाझर फुटला आणि डिलिव्हरी बॉयला खास भेट दिली. मिळालेली भेट पाहून डिलिव्हरी बॉयला आकाश ठेंगणे झाले होते. तर त्याच्या डोळ्यातील आनंद पाहून पोलीस कर्मचारीही खूश दिसत होता.
मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) इंदूरमध्ये (Indore) एका ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनीच्या 22 वर्षीय कर्मचाऱ्याला सायकलवरुन घरोघरी अन्न पोहोचवताना पाहून पोलिसांनी त्याला आर्थिक मदत करताना मोटारसायकल मिळवून दिली. एका पोलीस अधिकाऱ्याने सोमवारी ही माहिती दिली.
विजय नगर पोलिस स्टेशनचे प्रभारी तहजीब काझी यांनी सांगितले की, त्यांनी नुकतेच रात्रीच्या गस्तीदरम्यान पाहिले की, जय हळदे हा अतिशय वेगाने सायकल चालवत असताना घामाघूम होऊन अन्नाचे पार्सल घेऊन जात होता. त्यानी सांगितले की, 'त्याच्याशी संवाद साधला असता कळले की तो आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबातील आहे आणि त्याच्याकडे मोटरसायकल घेण्यासाठी पैसे नाहीत.'
काझी यांनी सांगितले की, विजय नगर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी शहरातील एका वाहन विक्रेत्याला आपापसात देणगी देऊन डाऊन पेमेंट केले आणि हळदे या तरुणाला मोटारसायकल मिळवून दिली. स्टेशन प्रभारींनी सांगितले की, स्वाभिमानी तरुणाने मोटारसायकलचे उर्वरित हप्ते स्वतः जमा करणार असल्याचे पोलिसांना सांगितले आहे.
मोटारसायकलबद्दल पोलिसांचे कृतज्ञता व्यक्त करताना हळदे म्हणाला, "आधी मी रोज रात्री सायकलने फक्त सहा ते आठ पार्सल जेवण घरी पोहोचवत होतो, पण आता मी दररोज रात्री 15 ते 20 खाद्यपदार्थांची पार्सल मोटारसायकलने नेत आहे."