सीहोर : मध्य प्रदेशमधील सीहोर जिल्ह्यात एक अनोखा आणि धक्कादायक प्रकार पुढे आलाय. मिळालेल्या माहितीनुसार एका खासगी फायनान्स कंपनीत कॅशिअर म्हणून काम करणाऱ्या एका युवकाने आपल्या प्रेमिकेवर पैसे उडविण्यासाठी कंपनीच्या तिजोरीत हात घातला आणि ६ लाख ७४ हजार रुपयांचा अपहार केला. मात्र, ज्यावेळी प्रियेसीने लग्नाला नकार दिला. त्यावेळी त्याने ५ लाख रुपयांना लाग लावून दिली. त्यानंतर पोलिसांनी पैसे जाळणाऱ्या कॅशिअरला अटक केली. त्याच्याकडून ४६ हजार रुपयांची रोकड आणि १ लाख २८ हजार रुपये लॉकरमधून जप्त करण्यात आले.
स्पंदना स्फूर्ती फायनान्स कंपनीत खासगी कर्ज देण्यात येते. पैसे अपहार प्रकरणी अटक करण्यात आलेला युवक कंपनीत कॅशिअर पदावर काम करत होता. युवकाचे नाव जितेंद्र गब्बू गोयल आहे. तो चौकडी तहसील खिरकिया जिल्ह्याचा रहिवासी आहे. सूत्रांच्या माहितीनुसार त्याच्याकडे कॅशिअरच्या रुमची चावी असायची. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १७ आणि १८ एप्रिल रोजी रात्री त्यांनी कंपनीच्या कॅशिअर तिजोरीतून ६ लाख ७४ हजार रुपये लांबविले.
कॅशिअर बेपत्ता झाल्यानंतर स्पंदना स्फूर्ती कंपनीत गोंधळ उडाला. त्यानंतर कंपनीच्या मॅनेजरने नसरुल्लागंज पोलिसात तक्रार दिली. मॅनेजरच्या तक्रारीनंतर पोलिसांनी जितेंद्र याच्याविरोधात ६ लाख ७४ हजार रुपयांचा अपहार केल्याचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी एक टीम तयार केली आणि तपासाचा वेग वाढविला. कन्नौदमधील बेरावल गावात पोहोचली. तेथून फरारी कॅशिअरला चौकशीसाठी ताब्यात घेतले.
कॅशिअर आपल्या प्रेमिकेला पैसे घेऊन दाखविण्यासाठी गेला होता. पैसे बघून प्रियेसी लग्न करण्यास तयार होईल. मात्र, प्रियेसीचे लग्न दुसऱ्या ठिकाणी ठरले होते. तिने लग्नाला विरोध करत नकार दिला. प्रियकर यामुळे नाराज झाला आणि त्याने रागाच्या भरात पैसे जाळून टाकले. ५ लाख रुपयांना चक्क आग लावली. पोलिसांनी जळालेल्या अवस्थेतील काही नोटा जप्त केल्यात. तर ४६ हजार रुपयांची रोकड जप्त केली.