सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी शिफारसीची गरज नाही

स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयानं मोठं विधान केलं आहे.

Updated: Nov 19, 2019, 04:46 PM IST
सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी शिफारसीची गरज नाही title=

नवी दिल्ली : स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयानं मोठं विधान केलं आहे. भारतरत्नासाठी औपचारिक शिफारशीची गरज नसून योग्य वेळी केंद्र सरकारकडून निर्णय घेण्यात येईल असं केंद्रीय गृहमंत्रालयानं म्हटलं आहे. लोकसभेमध्ये याबाबत प्रश्न विचारण्यात आल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयानं हे उत्तर दिलं आहे.

गृहमंत्रालयानं संसदेला माहिती देताना सावरकरांना भारतरत्न देण्याबाबत स्पष्ट असं काहीच सांगितलेलं नाही. भारतरत्न देण्यासाठी वेगवेगळ्या वर्गांमधून नेहमीच शिफारसी केल्या जातात, पण यासाठी कोणत्याही औपचारिक शिफारशीची गरज नाही. भारतरत्न देण्याबाबत वेळोवेळी निर्णय घेतला जातो, असं गृहमंत्रालयानं सांगितलं.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीआधी भाजपने त्यांच्या जाहीरनाम्यात सावरकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देऊ, असं आश्वासन दिलं होतं. पण राज्यात भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं नाही. यानंतर शिवसेनेने अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद वाटून मागितल्यामुळे दोन्ही पक्षांनी सत्ता स्थापन केली नाही. अखेर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. आता राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष मिळून सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरु आहेत.