नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या दिल्लीतील घराबाहेर केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पुन्हा सुरक्षाव्यवस्थात तैनात करण्यात आली आहे. आज सकाळपासून चार पोलीस आणि एक कमांडर पवारांच्या निवासस्थानाबाहेर तैनात करण्यात आला आहे.
सध्या महाराष्ट्रात शरद पवार यांना झेड दर्जाची सुरक्षा पुरवली जाते. दिल्लीत अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या निवासस्थानी दिल्ली पोलीस आणि निमलष्करी जवानांमार्फत सुरक्षा पुरवली जाते. पवारांच्या सहा जनपथ या निवासस्थानी दिल्ली पोलीस आणि निमलष्करी दलाचे प्रत्येकी तीन सुरक्षारक्षक तैनात असायचे. मात्र, महाराष्ट्रात सत्ताबदल झाल्यानंतर साधारण २० जानेवारीपासून केंद्रीय गृहमंत्रालयाने ही सुरक्षा हटवली होती.
पवारांची सुरक्षा हटवल्यानंतर आव्हाडांची प्रतिक्रिया
यावरून बराच गदारोळ निर्माण झाला होता. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपवर टीका केली होती. सूडाचं राजकारण करुन शरद पवारांची सुरक्षा हटवण्यात आली असेल, तर ती चुकीची गोष्ट आहे. जे देशासाठी महत्त्वाचे नेते आहेत, त्यांची सुरक्षा परत देण्यात यावी, अशी मागणी पवारांचे नातू आणि राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनी केली होती.
काही दिवसांपूर्वीच मोदी सरकारने केंद्रीय गृहमंत्रालयाने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांची एसपीजी सुरक्षा हटवली होती. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्याही एसपीजी सुरक्षेत बदल करण्यात आला होता. तर द्रमुक नेते एम. के. स्टॅलिन, तमिळनाडूचे उपमुख्यमंत्री पनीरसेल्वम यांना केंद्र सरकारतर्फे पुरवली जाणारी सुरक्षा व्यवस्थाही हटवण्यात आली होती.