मोदी सरकारने शरद पवारांच्या दिल्लीतील घराची सुरक्षा काढली

पवारांच्या सहा जनपथ या निवासस्थानी दिल्ली पोलीस आणि निमलष्करी दलाचे प्रत्येकी तीन सुरक्षारक्षक तैनात असायचे.

Updated: Jan 24, 2020, 10:34 AM IST
मोदी सरकारने शरद पवारांच्या दिल्लीतील घराची सुरक्षा काढली title=

नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या दिल्लीतील घराची सुरक्षा काढून घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रातील सत्ताबदलामुळे मोदी सरकारने हे पाऊल उचलल्याची कुजबूज  राजकीय वर्तुळात आहे. प्राथमिक माहितीनुसार, ही सुरक्षा हटवण्यापूर्वी सरकारकडून शरद पवार यांना कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती. तसेच ही सुरक्षा अचानक हटवण्यामागील कारणही अद्याप गुलदस्त्यात आहे. 

सध्या महाराष्ट्रात शरद पवार यांना झेड दर्जाची सुरक्षा पुरवली जाते. दिल्लीत अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या निवासस्थानी दिल्ली पोलीस आणि निमलष्करी जवानांमार्फत सुरक्षा पुरवली जाते. पवारांच्या सहा जनपथ या निवासस्थानी दिल्ली पोलीस आणि निमलष्करी दलाचे प्रत्येकी तीन सुरक्षारक्षक तैनात असायचे. मात्र, महाराष्ट्रात सत्ताबदल झाल्यानंतर साधारण २० जानेवारीपासून केंद्रीय गृहमंत्रालयाने ही सुरक्षा हटवल्याचे समजते. 

कोरेगाव- भीमा दंगल भाजप सरकारचे षडयंत्र; शरद पवारांचा गंभीर आरोप

काही दिवसांपूर्वीच केंद्रीय गृहमंत्रालयाने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांची एसपीजी सुरक्षा हटवली होती. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्याही एसपीजी सुरक्षेत बदल करण्यात आला होता. तर द्रमुक नेते एम. के. स्टॅलिन, तमिळनाडूचे उपमुख्यमंत्री पनीरसेल्वम यांना केंद्र सरकारतर्फे पुरवली जाणारी सुरक्षा व्यवस्थाही हटवण्यात आली होती.

अशाप्रकारे दिल्लीतील ४० अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेतही अचानक कपात झाल्याची माहिती आहे. दिल्लीत सुरु असलेली आंदोलने आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर ही सुरक्षाव्यवस्था अन्यत्र वळवण्यात आल्याचा अंदाज आहे. मात्र, कोणतीही पूर्वकल्पना न देता हे पाऊल उचलल्याने नेत्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.