पुढील ३ महिने जास्त पगार मिळणार, पीएफ खात्यात पैसे टाकणार मोदी सरकार

भविष्य निर्वाह निधीचा २४ टक्के हिस्सा केंद्र सरकार भरणार आहे.     

Updated: Jul 9, 2020, 11:47 AM IST
पुढील ३ महिने जास्त पगार मिळणार, पीएफ खात्यात पैसे टाकणार मोदी सरकार

नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. सलग तीन महिन्याच्या लॉकडाऊननंतर आता देश अनलॉकच्या मार्गावर आहे. या महामारीच्या काळात सर्वच उद्योगांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे उद्योग आणि कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधीमध्ये देण्यात आलेल्या सवलतीची मुदत आणखी तीन महिन्यांसाठी वाढवण्याचा निर्णय मोदी सरकारने  घेतला आहे. केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती बुधवारी दिली.

जून ते ऑगस्ट या महिन्यांसाठी  उद्योग आणि कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह  निधीचा २४ टक्के हिस्सा केंद्र सरकार भरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 

करोना काळात गरिबांसाठी जाहीर करण्यात आलेल्या या योजने अंतर्गत ज्या उद्योगांमध्ये १०० कर्मचारी काम करत आहेत, शिवाय त्यापैंकी ९० टक्के कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन १५ हजार रूपयांपेक्षा कमी असेल तर अशा कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. 

नियमाप्रमाणे भविष्य निर्वाह निधीचा १२ टक्के हिस्सा कर्मचारी तर १२ टक्के हिस्सा कंपनी असते. पण गेले तीन महिने दरमहा भविष्य निर्वाह निधीचा २४ टक्के हिस्सा केंद्र सरकार भरत आहे. ही योजना याआधी मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांसाठी लागू करण्यात आली होती. आता या सवलतीत मुदतवाढ करण्यात आली आहे.