मध्य प्रदेशात कायद्याच्या चिंधड्या, तरुणाला निर्वस्त्र करत बेदम मारहाण; व्हिडीओ व्हायरल

MP Crime : मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातून एका नग्न माणसाला काही लोकांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे, त्यानंतर पोलिसांनी अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या सगळ्या प्रकारामुळे मध्य प्रदेशात नेमकं काय सुरु आहे असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

आकाश नेटके | Updated: Jul 10, 2023, 08:37 AM IST
मध्य प्रदेशात कायद्याच्या चिंधड्या, तरुणाला निर्वस्त्र करत बेदम मारहाण; व्हिडीओ व्हायरल title=

Crime News : मध्य प्रदेशात (MP Crime) सातत्याने अत्याचाराच्या विविध घटना समोर येत आहे. एका मजुरावर भाजप (BJP) नेत्याने लघवी केल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता एका व्यक्तीला निर्वस्त्र करुन बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात (Sagar) एका व्यक्तीला नग्न करुन काही लोकांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यानंतर पोलिसांनी (MP Crime) अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कथित व्हिडिओमध्ये, काही लोक चोरीचा आरोप करत त्या व्यक्तीला लाठ्या आणि पाईपने मारहाण करताना दिसत आहेत.

मध्यप्रदेशातील निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तशातशा किळसवाण्या घटना समोर येत आहे. आधी सिधी जिल्ह्यात  एका आदिवासी व्यक्तीवर लघवी करतानाचा व्हिडिओ समोर आला होता. हे प्रकरण चर्चेत असतानाच ग्वाल्हेरमध्ये एका मुस्लिम तरुणाला कारमध्ये मारहाण करून त्याचे पाय चाटायला लावल्याचा व्हिडिओ समोर आला होता. ग्वाल्हेरनंतर ओलीस ठेवून मारहाण केल्याप्रकरणी तपास सुरू असतानाच सागर जिल्ह्यात एका तरुणाला नग्न अवस्थेत बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

काय आहे व्हायरल व्हिडिओमध्ये?

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका तरुणाला नग्नावस्थेत बसवण्यात आले आहे. त्यानंतर आळीपाळीने प्लॅस्टिक पाईप मारहाण केली जात आहे. मारहाणीमुळे तरुण रडत आहे. पुन्हा चूक करणार नाही अशी शपथही त्याला घ्यायला लावली जात आहे. मारहाण करणारे त्याच्याकडे चोरीच्या घटनेची चौकशी करत आहेत. हा व्हिडिओ मोतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्याची चर्चा  आहे. दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये पीडित तरुण नग्न उभी आहे आणि हात जोडून माफी मागत आहे. मारहाण करणारे लोक त्याला अंडरवेअर देखील घालू देत नाहीत. मात्र, पीडितेची किंवा मारहाण करणाऱ्या आरोपीची ओळख पटू शकली नाही. 

व्हायरल व्हिडिओबाबत वरिष्ठ पोलीस अधीक्षक विक्रम सिंह कुशवाह यांनी महत्त्वाची दिली आहे. "अनेक सोशल मीडिया ग्रुपवर मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओची वेळ, ठिकाण आणि व्यक्तींची ओळख पटलेली नाही. हा व्हिडिओ मोती नगर परिसरातील एका दुकानाच्या आवारातील असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओची दखल घेत मोती नगर पोलिस ठाण्यात प्रथमदर्शनी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ पोलीस ठाण्याच्या परिसराचा असल्याचे प्रचार केला जात आहे. जे पूर्णपणे खोटं आहे. पोलिसांनी व्हिडिओची दखल घेतली असून कारवाई करण्यात येत असून आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक करण्यात येणार आहे," असे वरिष्ठ पोलीस अधीक्षक विक्रम सिंह कुशवाह यांनी सांगितले.

दरम्यान, गेल्या एका आठवड्यात सोशल मीडियावर मध्य प्रदेशातील अशा हल्ल्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले होते. मध्य प्रदेशच्या सिधी जिल्ह्यात एका आदिवासी व्यक्तीवर लघवी करतानाचा एक व्हिडिओ समोर आल्याने देशभरात संतापाची लाट उसळली होती. याप्रकरणी आरोपी प्रवेश शुक्ला याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर कठोर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रवेश शुक्लाच्या कुटुंबाचे घरही पाडण्यात आले आहे.