मुंबई पोलिसांची गुजरातमध्ये धडक कारवाई, 1 हजार कोटींचे अंमली पदार्थ जप्त

मुंबई पोलिसांनी गुजरातमध्ये केला ड्रग्स फॅक्टरीचा पर्दाफाश

Updated: Aug 16, 2022, 09:10 PM IST
मुंबई पोलिसांची गुजरातमध्ये धडक कारवाई, 1 हजार कोटींचे अंमली पदार्थ जप्त title=

Mumbai Anti Narcotics Cell : मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) अंमली पदार्थविरोधी पथकाने गुजरातमध्ये धडक कारवाई करत अंमली पदार्थांचा मोठा साठा जप्त केला आहे. 

मुंबई अंमली पदार्थविरोधी पथकाच्या वरळी युनिटने (worli unit) गुजरातमधील (Gujrat) भरूच (Bharuch) जिल्ह्यातील अंकलेश्वर भागात एका ड्रग्ज फॅक्टरीचा (drug factory) पर्दाफाश केला. या छाप्यात सुमारे 513 किलो एमडी ड्रग्ज जप्त करण्यात पथकाला यश आलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या अंमली पदार्थांची किंमत जवळपास 1 हजार 26 कोटी रुपये आहे. याप्रकरणी एका महिलेसह 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

याआधी जून महिन्यात गुजरातच्या सागरी भागात कोट्यवधी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील जखो जिल्ह्यात BSF आणि कच्छ पोलिसांनी एकत्रित कारवाई करत मोठ्या प्रमाणात हेरॉईन जप्त केलं. या कारवाईत गुजरात एटीएस आणि भारतीय तटरक्षक दलाने सात पाकिस्तानी नागरिकांना पाकिस्तानी बोटीसह ताब्यात घेतलं होतं. 

तर गेल्या वर्षी सप्टेंबर 2021 मध्ये गुजरातमधील मुंद्रा बंदरावर 3,000 किलो ड्रग्जची खेप पकडली गेली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत 21,000 कोटी असल्याचे सांगण्यात आलं. महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) अफगाणिस्तानमधून आयात केलेल्या दोन कंटेनरमधून 3,000 किलो हेरॉईन जप्त केलं होतं. या प्रकरणी चेन्नई इथून दोघांना अटक करण्यात आली होती. 

याशिवाय मे 2022 मध्ये 56 किलो तर जुलै 2022 मध्ये 75 किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते.