नवी दिल्ली : देशातील तीन राज्यांत भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर भाजपने सावध भूमिका घेतली आहे. महाराष्ट्रात भाजप - शिवसेना युती होणार की नाही, हे अजून निश्चित नाही. त्यामुळे महाराष्ट्रात भाजपला कोणताही धोका पत्करायचा नाही. त्यामुळे भाजपचे पक्ष अध्यक्ष अमित शाह यांनी तातडीने राज्यातील खासदारांची दिल्लीत बैठक बोलावलेय. या बैठकीला खासदार नारायण राणेही उपस्थित राहिले आहेत. त्यामुळे राणेंच्या उपस्थितीची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झालेय.
'भाजपच्या जीवावर खासदार झालेल्या नारायण राणेंची हकालपट्टी करा'
दरम्यान, राणे हे भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करतात, म्हणून त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष प्रमोद जठार यांनी केली होती. त्यानंतर त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्य ती समज दिल्याची चर्चा आहे. राणे यांचा स्वत:चा महाराष्ट्र स्वाभिमान हा राजकीय पक्ष आहे. ते या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत. मात्र, ते भाजपकडून राज्यसभेवर निवडून गेले आहेत.
भाजपकडून पहिलीच बैठक महाराष्ट्रातील खासदारांची बोलवण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी ही बैठक बोलावली आहे. या बैठकीत काय चर्चा होणार याची उत्सुकता लागली आहे. दरम्यान, या बैठकीला महाराष्ट्राचे केंद्रातील मंत्री नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, सुभाष भामरे, हंसराज अहिर बैठकीला उपस्थित आहेत.