मंत्रिपद मिळेलच या भ्रमात राहू नका; नरेंद्र मोदींचा खासदारांना इशारा

अनेक नवख्या खासदारांना पंतप्रधान कार्यालयातून बोलतोय, असे खोटे फोन केले जातात.

Updated: May 26, 2019, 07:56 AM IST
मंत्रिपद मिळेलच या भ्रमात राहू नका; नरेंद्र मोदींचा खासदारांना इशारा title=

नवी दिल्ली: लोकसभेची निवडणूक जिंकल्यानंतर मंत्रिपदाची स्वप्ने पाहणाऱ्या खासदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्याही भ्रमात न राहण्याचा सल्ला दिला. ते शनिवारी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (रालोआ) नवनिर्वाचित खासदारांशी संवाद साधताना मंत्रिपदाकडे डोळे लावून बसलेल्या खासदारांना शाब्दिक चिमटा काढला. त्यांनी म्हटले की, देशात सध्या अनेक नरेंद्र मोदी तयार झाले आहेत. या सगळ्यांनी आपापल्या अंदाजानुसार मंत्रिमंडळही तयार केले आहे. या सगळ्याचा हिशोब लावायचा झाला तर ५४२ पैकी मंत्रिमंडळात स्थान मिळणार नाही, असे पाचपन्नास खासदारच उरतील, अशी मिष्किल टिप्पणी नरेंद्र मोदी यांनी केली. 

अनेक नवख्या खासदारांना पंतप्रधान कार्यालयातून बोलतोय, असे खोटे फोन केले जातात. प्रसारमाध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्या पाहून अनेकांना मंत्रिपद मिळेलच, असे वाटू लागते. काही महाभाग तर या खासदारांना मंत्रिमंडळाच्या अंतिम यादीत तुमचे नाव होतेच, मात्र राष्ट्रपतींकडे जाईपर्यंत त्यामध्ये बदल झाले, अशा भुलथापा देतात. जणूकाही मंत्रिमंडळाची यादी तयार करताना ते माझ्याच बाजूला बसलेले असतात, असा या महाभागांचा आविर्भाव असतो. 

त्यामुळे प्रसारमाध्यमांमध्ये चालवल्या जाणाऱ्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका. हे सर्व फूट पाडण्यासाठी, आपले हेतू साध्या करण्यासाठी आणि अफवा पसरवण्यासाठी केले जात आहे. त्यामुळे आपल्याला मंत्रिपद मिळेल, या भ्रमात राहू नका. कोणाच्याही शिफारशीने मंत्रिपद मिळत नाही. जे काही निकष असतील त्याआधारेच मंत्रिपद मिळेल. माझ्यासाठी कोणीही आपला किंवा परका नाही, जिंकून आलेले सर्वचजण माझे आहेत. शेवटी मंत्रिपद हे मोजक्याच लोकांना मिळू शकते, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.