चेन्नई : पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात तब्बल ९० मिनिटे चर्चा झाली. या चर्चेत काश्मीर प्रश्नावर कोणतीही चर्चा झाली नसल्याची माहिती परराष्ट्र खात्याचे सचिव गोखले यांनी दिली आहे. दरम्यान पुढील अनौपचारिक चर्चा चीनमध्ये घेण्यात यावी, अशी मागणी चीनकडून करण्यात आली. या मागणीचा स्विकार मोदींकडून करण्यात आल्याचे परराष्ट्र खात्याकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान संरक्षण मंत्र्यांना देखील चीन दौऱ्यावर आमंत्रित करण्यात आलं असून अद्याप या दौऱ्याची कोणतीही तारीख ठरवण्यात आलेली नाही. याखेरीज दशतवाद,व्यापार या मुद्दयांवरही दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती परराष्ट्र खात्याकडून देण्यात आली आहे.
चीनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या महाबलीपूरम भेटीकडं अख्ख्या जगाचं लक्ष होतं. कारण हा दौरा अनौपचारिक होता. शी जिनपिंग यांचं खास देशी स्वागत होईल याकडं विशेष लक्ष देण्यात आले होते. जिनपिंग यांना घेऊन येणारं खास विमान चेन्नई विमानतळावर लँड होतानाच विमानतळावर एकच जल्लोष सुरु झाला. तामिळनाडूतील संस्कृतिचे प्रतिक असलेल्या वाद्यांचा गजर सुरु झाला. या वाद्यांच्या तालावर आदिवासी नृत्य केलं जात होतं. जवळपास दोन हजार शाळकरी विद्यार्थी लाल रंगाच्या वेशभूषेत जिनपिंग यांच्या स्वागतासाठी तयार होते.
या विद्यार्थ्यांनी चेहऱ्यावर जिनपिंग यांचे मुखवटे घातले होते. तर त्यांच्या हातात चीनचा राष्ट्रध्वज होता. जिनपिंग हे विमानातून खाली उतरल्यानंतर त्यांचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी औपचारिक स्वागत केलं. जिनपिंग यांच्या स्वागताचा उत्सवी माहौल पाहण्यासारखा होता. पारंपारिक वाद्यांच्या तालावर भरतनाट्यम सुरू होतं. जिनपिंग स्वागतासाठी आलेल्या प्रत्येक पथकाचं अभिवादन स्वीकारत होते. क्षणभर थांबून त्यांच्या कलेचं कौतक करत होते. एकादा मित्र यावा आणि त्याचं मनापासून स्वागत व्हावं असा हा सोहळा होता. हा सोहळा भविष्यातल्या भारत आणि चीन संबधांचा पाया ठरेल असाच होता.