राहुल गांधींसाठी दिल्ली पेटली, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जाळपोळ

काँग्रेस नेते राहुल गांधी  (Rahul Gandhi)यांची ईडीकडून आज सलग तिसऱ्या दिवशी चौकशी 

Updated: Jun 15, 2022, 03:36 PM IST
राहुल गांधींसाठी दिल्ली पेटली, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जाळपोळ title=

National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी  (Rahul Gandhi)यांची आज सलग तिसऱ्या दिवशी चौकशी करण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसांत ईडीने (ED) राहुल गांधींची तब्बल 18 तास चौकशी केली, ज्यामध्ये राहुल यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.

ईडीच्या चौकशीविरोधात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले असून पक्षाच्या मुख्यालयाबाहेर जोरदार निदर्शने करत आहेत. आंदोलकांनी 'मी देखील राहुल आहे' असे फलक हातात धरत निदर्शने केली. अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chowdhury) यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. 

काँग्रेस कार्यकर्त्यांनी ईडी कार्यालयाजवळही जोरदार निदर्शने सुरू केली असून, रस्त्यावर टायर पेटवण्या आले. आमचा आवाज दाबता येणार नाही, अशी घोषणाबाजी कार्यकर्त्यांनी केली. यावेळी पोलीसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केली असून काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेण्यात येत आहे.

काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले, 'भाजप, मोदी सरकार आणि दिल्ली पोलीस आता गुंडगिरीवर उतरले आहेत. एआयसीसी (AICC) कार्यालयात घुसून कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना मारहाण करून संयमाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. आम्ही गांधीवादी, शांतताप्रिय आणि अहिंसक आहोत. कार्यालयाचे दरवाजे तोडून गुंडगिरी केली, तर काँग्रेसचे कार्यकर्ते गप्प बसतील, असे समजू नका. आम्हाला कसे उत्तर द्यावे हे देखील माहित आहे, अस सुरजेवाला यांनी म्हटलं आहे.

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले, 'संपूर्ण देशात जी परिस्थिती आहे ती सर्वांसमोर आहे. तीन दिवस आम्ही दिल्लीत आहोत आणि पहिल्या दिवशी 200 लोकांना परवानगी देण्यात आली, काल काही नेत्यांना परवानगी देण्यात आली आणि आज आम्ही आमचे कर्मचारी देखील आणू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण करण्यात आल्याचं भूपेश बघेल यांनी म्हटलंय.

काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची
अकबर रोडवरील पक्षाच्या मुख्यालयाबाहेर दिल्ली पोलिस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती आहे. पोलीस आणि कार्यकर्त्यांदरम्यान बाचाबाची झाल्याच्याही घटना समोर आल्या आहेत.