नवी दिल्ली : राजधानी दिल्ली अजूनही धुरकटलेलीच आहे. दिल्लीतल्या प्रदूषणाची पातळी आणीबाणीच्या पातळीवर पोहचलीय. शनिवारी दिल्लीतल्या प्रदूषणाच्या पातळीत घट झाली होती.
गेल्या काही वर्षात दिल्लीतील प्रदूषणाची पातळी धोकादायक उच्चांक गाठत असल्याचे समोर आले आहे.त्यामुळे १९ नोव्हेंबरला होणारी एयरटेल दिल्ली हाफ मॅरेथॉन रद्द करण्याची मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनने केली आहे.
नोव्हेंबरमध्ये थंडीमध्ये धुक्याची चादर पूर्ण दिल्लीवर पसरलेली असते. त्यात धूर मिसळल्याने धुरके तयार झाल्यामुळे दृश्यमानतेवर परिणाम होत आहे. कमी दृश्यमानतेमुळे ट्रेन विलंबाने धावत असून विमानांची उड्डाणे उशिराने होत आहेत. हवेतील शुद्धतेची पातळी घसरली असून एनसीआर परिसरात सर्वाधिक प्रदूषणाची नोंद आढळली आहे.
मात्र शनिवारी संध्याकाळनंतर प्रदूषण पुन्हा एकदा वाढलंय. सकाळपासूनच दिल्लीत दाट धूर आणि धुके पाहायला मिळतंय. धुरक्यामुळे दिल्लीतल्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.