Nipah Virus : कोरोनाच्या विळख्यातून जग सावरलेलं असतानाच आता पुन्हा एकदा भारतात आणखी एका विषाणूनं डोकं वर काढलं आहे. ज्यामुळं देशातील आरोग्य यंत्रणांसोबतच विविध राज्यही सतर्क झाली आहेत. केरळमधील कोझिकोड जिल्ह्यात निपाह विषाणूच्या संसर्गामुळं दोघांचा मृत्यू झाल्याची बाब आता स्पष्ट झाली असून, केंद्राकडून या वृत्ताला दुजोराही देण्यात आला आहे. सध्याच्या घडीला केरळात निपाहचे चार संशयित रुग्ण आढळले असून, आरोग्य विभाग या रुग्णांवर नजर ठेवून आहे.
प्राथमिक स्तरावर या रुग्णांचे नमुने पुढील चाचणीसाठी पाठवण्यात आले असून, परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं एक पथक केरळात दाखल झालं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी यासंदर्भातील मार्गदर्शक तत्वं जारी केली असून या प्रादुर्भावावर कोणतीही लस अद्याप विकसित झाली नसल्याचंही स्पष्ट केलं आहे.
आपण निपाह विषाणूपासुन सुरक्षित आहोत का? असा प्रश्न तुम्हालाही पडत असेल तर आधी या विषाणूबाबतची प्राथमिक लक्षणं जाणून घेणं आणि अफवा न पसरवणं ही बाब कायम लक्षात ठेवा.
प्राथमिक लक्षण- ताप, डोकेदुखी, कफ, घसादुखी, श्वसनात अडथळा, मळमळ
गंभीर लक्षणं - चक्कर येणं, गुंगी येणं, आकडी येणं, कोमा, मेंदूमध्ये रस्तस्त्राव
निपाहची लागण झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यास त्या व्यक्तीच्या थुंकी, रक्त, लघवी अशा द्रवांमुळं संसर्ग पसरू शकतो. विषाणूंचा संसर्ग झालेल्या प्राण्यांच्या संपर्कात आल्यासही या संसर्गाचा धोका असतो. शिवाय विषाणूबाधित प्राण्यांचं मांस खाल्ल्यास निपाहचा धोका वाढतो.
निपाहच्या संसर्गाबाबत राज्यात असणारं भीतीचं वातावरण पाहता मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी नागरिकांना सतर्क राहण्यास सांगत घाबरून न जाण्याचं आवाहन केलं. दरम्यान केरळातील निपाहच्या संसर्गासंदर्भात पुण्यातील एनआयव्हीकडून समोर आलेल्या अहवालानुसार लागण होणाऱ्या रुग्णांमध्ये 9 वर्षांच्या मुलाचाही समावेश असल्याची माहिती समोर आली.