नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांच्या मतदारसंघात चारपदरी महामार्ग तयार करण्यात आला. या महामार्गाचे उद्घाटन करण्यात आले. मात्र, साधे ज्योतिरादित्य शिंदे यांना निमंत्रण नव्हते. तसेच निमंत्रण पत्रिकेत नावही छापले नव्हते. त्यामुळे हा मुद्दा काँग्रेसकडून लोकसभेत उपस्थित करण्यात आला. त्यावेळी केंद्रीय रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्री नितिन गडकरी यांना आपल्या विभागाच्यावतीने माफी मागावी लागली. शून्य मिनिटांच्या कालावधीत काँग्रेसचे खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी हा विषय मांडला. आपल्या विशेषाधिकाराचा भंग झाल्याचे सांगत विषय मांडला.
चार पदरी महामार्गाच्या लोकार्पण कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितिन गडकरी आले होते. निमंत्रण पत्रिकेवर माझे नाव नव्हते. मुख्यमंत्री आणि राज्य सरकारचे सगळ्या लोकांची नावे होती. हा विशेषाधिकाराचा भंग आहे. मी विशेषाधिकार भंगचा प्रस्ताव अध्यक्षकांकडे देत आहे, ज्योतिरादित्य म्हणालेत. निमंत्रण पत्रिकेत त्यांचे (ज्योतिरादित्य) नाव नव्हते. ही माझी जबाबदारी आहे. कारण मी या विभागाचा मंत्री आहे. खासदार यांचे कार्यक्रम पत्रिकेत नाव पाहिजे होते. मी माझ्या विभागाच्यावतीने माफी मागतो. दरम्यान, काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनीही सांगितले की, या प्रकारे सर्वांशी चांगला व्यवहार झाला पाहिजे, ही बाब ठिक नाही.
गडकरी यांच्या उत्तरानंतर काँग्रेस सदस्य शांत राहिले नाहीत. ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह काँग्रेसचे अन्य सदस्य सरकारविरोधी संताप व्यक्त करत उभे होते. यावेळी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सांगितले, गडकरी यांनी माफी मागितली आहे. हे त्यांचे मोठेपण आहे. ही चांगली पद्धत आहे. काँग्रेस सदस्यांनी शांत राहिले पाहिजे. ज्योतिरादित्य हा प्रकार योग्य नाही, असे महाजन यांनी यावेळी म्हटले. दरम्यान, केंद्र सरकारचा कोणताही कार्यक्रम असो, तेथील खासदाराला बोलावलेच पाहिजे. मात्र, बोलावले नाही तर मी सांगते, त्यांना बोलावलेच पाहिजे.
ग्रामीण विकास मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी सांगितले की, गडकरी यांनी माफी मागितलेली आहे. या विषयावर आता राजकारण केले जाऊ नये. काँग्रेसचे सरकार होते त्यावेळी किती खासदारांना तुम्ही बोलावलेत.