नवी दिल्ली : प्रचंड राजकीय उलथापालथीनंतर शिवसेना-एनसीपी आणि काँग्रेसचे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कार्यभाग स्वीकारला. अशावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे धक्कादायक विधान समोर आले आहे. शिवसेना-एनसीपी आणि काँग्रेसचे सरकार सिद्धांतांच्या विरोधात असून हे सरकार जास्त दिवस टीकणार नाही असे गडकरी यांनी म्हटले. 'झी न्यूज'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.
२०१८ मध्ये साधारण ७५ टक्के भागावर भाजपचा झेंडा होता पण आता एका वर्षातच हा प्रवास ४० टक्क्यांवर आला असल्याचा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. याला उत्तर देताना प्रत्येक निवडणूक ही आमच्यासाठी आव्हान असते. प्रत्येक निवडणूक ही आमच्यासाठी महत्वाची असते. उतार-चढाव हे पक्षामध्ये येत असतात. राजकारणात काहीच शाश्वत नसत. अशा गतीनेच काम होणे गरजेचे असल्याचे गडकरी म्हणाले.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कोणीच विरोधकच राहीला नसल्याचा दावा भाजपतर्फे निवडणुकीपूर्वी करण्यात आला होता. यावरही गडकरी यांनी भाष्य केले. महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजप बहुमतामध्ये आले आहेत. जनतेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात मतदान केले आहे. शिवसेनेने ज्यांच्या विरोधात मत मागितले त्यांच्याशीच हात मिळवणी करुन जनतेचा विश्वासघात केला. यामुळे शिवसेनेचे समर्थक देखील नाराज आहेत. शिवसेनेच्या हिंदुत्वाचा ताळमेळ एनसीपी-काँग्रेसशी बसणार नाही. आणि काँग्रेस-एनसीपीच्या विचारांचा ताळमेळ शिवसेनेशी बसत नाही त्यामुळे ही आघाडी फार काळ टीकणार नसल्याचे गडकरी म्हणाले.
जर भाजप आणि एनसीपीचे सरकार बनले असते तर ते ५ वर्षे टीकले असते का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. जरतर च्या चर्चांना राजकारणात स्थान नसते. एनसीपी आणि भाजपच्या युतीची अधिकृत चर्चा झाली नाही असे गडकरी म्हणाले. त्यावेळी अजित पवार यांच्यासोबत काही आमदार एनसीपी सोडू इच्छित होते. त्यावेळी त्यांची संख्या मोठी होती. पण नंतर ते आले नाहीत. राजकारणात हे होत असते असे त्यांनी स्पष्ट केले.
गडकरींची इच्छा असती तर ते पवारांशी बोलू शकले असते आणि भाजप-एनसीपीचे सरकार आले असते अशी शक्यता होती का ? यावरही त्यांनी उत्तर दिले. असं काही नाही. सर्वांनी प्रयत्न केले. पण प्रत्येक पार्टी आणि त्याचे नेते हे आपापल्या पार्टी आणि विचारांचे हित पाहतात असे स्पष्टीकरण त्यांनी दिेले.
शिवसेनेला मुख्यमंत्री पद हवे होते आणि आम्ही त्याला स्पष्ट नकार दिला. आम्ही त्यांना कधीच असे आश्वासन दिले नव्हते. इतर गोष्टीत कमी जास्त करता आले असते. बाळासाहेब ठाकरे यांच्या वेळेपासून हे समीकरण सुरु आहे. आमचे १०५ आहेत आणि त्यांचे ५५ आहेत. उद्धव म्हणतात त्यांचा मुख्यमंत्री व्हावा. हे कसे शक्य आहे ? राजकारणात काही गोष्टी ठरलेल्या असतात. सर्वच असे बोलले तर राजकारण करणे कठीण होईल असेही गडकरी म्हणाले.