'...तर पेट्रोल ५० रुपये आणि डिझेल ५५ रुपये लीटर मिळेल'

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांविरोधात काँग्रेसनं सोमवारी भारत बंद केला होता.

Updated: Sep 11, 2018, 07:07 PM IST
'...तर पेट्रोल ५० रुपये आणि डिझेल ५५ रुपये लीटर मिळेल'

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांविरोधात काँग्रेसनं सोमवारी भारत बंद केला होता. या आंदोलनात काँग्रेस आणि इतर पक्षांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. या सगळ्या वादामध्ये केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. पेट्रोलियम मंत्रालयानं देशात ५ इथेनॉल निर्माण प्लांट लावणार आहे. यामुळे डिझेल ५० रुपये आणि पेट्रोल ५५ रुपये लीटर मिळेल, असं गडकरी म्हणाले आहेत. छत्तीसगड दौऱ्यावर असलेल्या दुर्गमध्ये गडकरींनी हे वक्तव्य केलंय.

छत्तीसगड देशाचं जैव इंधन केंद्र

छत्तीसगड देशातचं जैव इंधन केंद्र बनू शकतं असं गडकरी म्हणाले. नागपूरमध्ये १ हजार ट्रॅक्टर जैव इंधनावर चालतात. जैव इंधन क्षेत्रामध्ये संशोधन करण्याची आवश्यकता आहे. आम्ही पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळून वाहनं चालवण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे. याला आणखी प्रोत्साहन देण्यात येईल, अशी प्रतिक्रिया गडकरींनी दिली.

आपण ८ लाख कोटी रुपयांचं पेट्रोल आणि डिझेल आयात करतोय. याच्या किंमती वाढतायत आणि रुपया डॉलरच्या तुलनेत पडतोय. देशाचा शेतकरी, आदिवासी आणि वनवासी इथेनॉल, मिथेनॉल आणि जैव इंधनाचं उत्पादन करू शकतो, हे मी मागच्या १५ वर्षांपासून सांगतोय, असं गडकरी म्हणाले. देशात पेट्रोलियम मंत्रालय पाच इथेनॉल संयंत्र बसवणार आहेत. याठिकाणी तांदुळाचा भुसा, गव्हाचा भुसा, बांबू आणि उसापासून इथेनॉल बनवण्यात येईल, अशी माहिती गडकरींनी दिली.