Expressway: मोदी सरकारने करुन दाखवलं! Budget आधीच नितिन गडकरींनी केली मोठी घोषणा

Nitin Gadkari: केंद्रीय रस्ते परिवहन, महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी दिल्ली-मुंबई एक्सप्रेस-वेसंदर्भातील मोठी घोषणा दिल्लीमध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये बोलताना केली. गडकरींनी सूचक विधान करत ही घोषणा केली असून सविस्तर माहिती दिलेली नाही.

Updated: Jan 25, 2023, 08:17 PM IST
Expressway: मोदी सरकारने करुन दाखवलं! Budget आधीच नितिन गडकरींनी केली मोठी घोषणा title=
modi and gadkari

Mumbai-Delhi Expressway: देशाचा वर्षिक अर्थसंकल्प (Budget 2023) काही दिवसांमध्ये सादर केला जाणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये केंद्र सरकारकडून अनेक घोषणा केल्या जाण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे सर्वसामान्यांना दिलासा देणाऱ्या गोष्टींचा समावेश असेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. असं असतानाच अर्थसंकल्पाच्या काही दिवस आधीच केंद्रीय मंत्री नितिन गडकरींनी (Nitin Gadkari) एक महत्त्वाची घोषणा केली आहे. नितिन गडकरींनी दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेसंदर्भातील मोठी घोषणा करताना सोहना-दौसा खंड (Sohna-Dausa section of Delhi Mumbai Expressway) हा टप्पा या महिन्याच्या शेवटच्या तारखेच्या आधीच कार्यरत होईल आणि तो सर्वसामान्यांना वापरता येईल असं म्हटलं आहे.

270 किमी अंतर

केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरींनी दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेचा सोहना-दौसा खंड टप्प्याचं उद्घाटन याच महिन्याच्या शेवटापर्यंत होईल. यामुळे दिल्ली आणि जयपूरमधील प्रवास अधिक सुखकर होणार आहे. जयपूरपासून दिल्ली अवघ्या दोन तासांच्या अंतरावर येणार आहे. दिल्ली आणि जयपुरमधील अंतर 270 किमी इतकं आहे. 

गडकरींचं सूचक विधान

दिल्ली एका कार्यक्रमामध्ये बोलताना गडकरींनी, "याच महिन्यात तुम्ही दिल्लीहून जयपुरला केवळ दोन तासांमध्ये पोहचू शकाल," असं म्हटलं. त्यांनी यासंदर्भातील सविस्तर माहिती दिलेली नाही. सोहना (हरियणा) - दौसा (राजस्थान) खंड दरम्यानचा टप्पा हा दिल्ली-मुंबई एक्सप्रेस-वेचा पहिला टप्पा आहे. 

कसा असणार हा एक्सप्रेस-वे?

दिल्ली-मुंबई एक्सप्रेस-वे हा भारतामधील सर्वाधिक लांबीचा एक्सप्रेस-वे असणार आहे. या एक्सप्रेसवेची एकूण लांबी 1 हजार 390 किलोमीटर इतकी असणार आहे. हा एक्सप्रेस-वे सुरु झाल्यानंतर दिल्ली आणि मुंबईदरम्यानचं अंतर 12 तासांमध्ये कापता येणार आहे. सध्या देशाची आर्थिक राजधानी ते राजधानीच्या शहरातील अंतर कापण्यासाठी रस्ते मार्गाने 24 तासांचा वेळ लागतो. म्हणजेच नव्या एक्सप्रेस-वेमुळे अर्ध्या वेळात या दोन महत्त्वाच्या शहरांमध्ये पोहचता येईल. मोदी सरकारच्या महत्त्वकांशी प्रकल्पांपैकी हा एक महत्त्वाचा प्रकल्प आहे. दिल्ली, हरियणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रातून हा एक्सप्रेस-वे जाणार आहे. या एक्सप्रेस-वेमुळे सोहना, मेवठ, अल्वार, दौसा, सवाई माधोपूर, कोट्टा, मंदसौर, रतलाम, दोहोड, गोध्रा, वरोदरा, भरुच, सुरत, नवसारी, वल्साड, विरार आणि मुंबई ही महत्त्वाची शहरं जोडली जाणार आहेत. हा आठ पदरी एक्सप्रेस-वे असणार आहे. यामुळे दिल्ली आणि मुंबईबरोबरच इतर राज्यांमधील महत्त्वाची शहरं जोडली जाणार आहेत.