मॅरेथॉन बैठकांनंतरही गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाबाबत अनिश्चितता कायम

 रविवारी मध्यरात्रीपासूनच गोव्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. 

Updated: Mar 18, 2019, 08:05 AM IST
मॅरेथॉन बैठकांनंतरही गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाबाबत अनिश्चितता कायम  title=

पणजी : #ManoharParrikar रविवारी (१७ मार्च) गोव्याच मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर साऱ्या देशातून शोक व्यक्त केला गेला. गोव्याच्या जनतेकडूनही पर्रिकरांच्या निधनाचं दु:ख व्यक्त करण्यात आलं. गोव्याला स्थिर सरकार देणाऱ्या पर्रिकरांच्या निधनानंतर रिक्त झालल्या मुख्यमंत्रीपदी कोणाच्या नावाला प्राधान्य देण्यात येणार याविषयीच्याच चर्चांना वेग आला आहे. रविवारी मध्यरात्रीपासूनच गोव्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. 

पर्रिकर यांच्या निधनानंतर रात्री दीड वाजण्याच्या सुमारास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे गोव्यात पोहोचे, जेथे एका हॉटेलमध्ये त्यांनी एक बैठक घेतली. गोव्याचा मुख्यमंत्री निवडण्यासाठी गडकरी प्रचंड सक्रिय झाले असले तरीही या पदासाठी अद्यापही कोणाच्याच नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेलं नाही. अनेक मॅरेथॉन बैठकींनंतरही भाजपकडून गोव्याच्या मुख्यमंत्रीपदासाठीची अनिश्चितता मात्र कायम असल्याचच स्पष्ट होत आहे. 

दरम्यान, एकिकडे काँग्रेस नेते दिगंबर कामत यांच्या भाजपा प्रवेशानंतर त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा भार सोपवण्याच्या चर्चांना रविवारी उधाण आलं होतं. पण, आता मात्र चित्र बदललं असून, मायकल लोबो, श्रीपाद नाईक, सुदीन ढवळीकर यांची नावंही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याचं कळत आहे. नितीन गडकरी यांनी अद्यापही या संपूर्ण प्रकरणावर कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. पण, भाजपच्या मायकल लोबो यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टीच्या सुदीन ढवळीकर यांनी मुख्यमंत्रीपदात स्वारस्य दाखवलं आहे. त्यामुळे आता पर्रिकरांच्या गोव्याची धुरा कोणाच्या हाती दिली जाणार याकडेच साऱ्या गोव्याचं आणि देशाचं लक्ष लागलं आहे.