नवी दिल्ली : ईशान्य भारतात झालेल्या निवडणुकींमध्ये भाजपला घवघवीत यश मिळालं आहे. त्रिपुरामध्ये भाजपला बहुमत मिळालं आहे. या राज्यामध्ये २५ वर्ष असलेली डाव्यांची सत्ता भाजपनं उलथवून लावली आहे. तर नागालँडमध्येही भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरला आहे. ६० मतदारसंघाच्या या राज्यामध्ये भाजपला २९ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे नागालँडमध्येही भाजपचाच मुख्यमंत्री होईल हे निश्चित मानलं जात आहे.
मेघालयमध्ये मात्र काँग्रेस हा सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष बनला आहे. ५९ मतदारसंघाच्या या राज्यामध्ये काँग्रेसला २१ जागा मिळाल्या आहेत. तर भाजपला २ जागांवर यश मिळालं आहे. मागच्या निवडणुकीत नागालँडमध्ये भाजपला एकही जागा जिंकता आली नव्हती.
या सगळ्या विजयावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकामागोमाग एक भाजप प्रत्येक राज्यामध्ये निवडणूक जिंकते आहे. हे सकारात्मक असल्याचं अमित शहा म्हणाले. असं असलं तरी हा भाजपसाठी सुर्वणकाळ नाही, असं अमित शहांना वाटत आहे. जोपर्यंत ओडिसा, पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये भाजपचा विजय होत नाही तोपर्यंत भाजपचा सुवर्णकाळ सुरु होणार नाही. कर्नाटकमध्ये तर आम्ही जिंकणारच आहोत, असं अमित शहा म्हणाले.
ईशान्य भारतात मिळालेला विजय हा मोदींच्या विकासाच्या राजकारणाचा विजय आहे, असं अमित शहा म्हणालेत. २०१३ साली त्रिपुरामध्ये भाजपला एकही जागा मिळालेली नव्हती. एकाच उमेदवाराला त्याचं डिपॉझिट वाचवता आलं होतं, पण आज भाजपला या राज्यामध्ये स्पष्ट बहुमत मिळालं आहे. डाव्यांचा गड असलेल्या त्रिपुरामध्ये भाजपनं सुरुंग लावला आहे.
२०१४ साली नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर त्यांनी ईशान्य भारतातल्या राज्यांचा विकासाला सुरुवात केली. मोदींच्या ऍक्ट इस्ट पॉलीसीनुसार १५ दिवसांमध्ये एक मंत्री ईशान्य भारताच्या दौऱ्यावर जाऊन तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतात. यामुळेच ईशान्य भारतात भाजपला विजय मिळाला, असं वक्तव्य शहांनी केलं. लेफ्ट हा देशाच्या कोणत्याच भागात राईट नाही, असा टोमणाही शहांनी लगावला.