मुंबई : कोरोना विषाणूचा एक नवीन प्रकार सध्या समोर आला आहे. ज्यामुळे भारतातच नाही, तर जगात बऱ्याच ठिकाणी याचे रुग्ण सापडले आहेत. या व्हायरस चे नाव ओमिक्रॉन आहे. ओमिक्रॉन सध्या अनेक लोकांना संक्रमित करत आहे, याचा पहिला रुग्ण दक्षिण अफ्रिकेत सापडला आहे. लोकांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तिसऱ्या बूस्टर डोसवरही डॉक्टरांमध्ये विचार सुरू आहे. दरम्यान, यूके हेल्थ सिक्युरिटी एजन्सी (UKHSA) ने शुक्रवारी सांगितले की, कोविड-19 लसीचा तिसरा बूस्टर डोस ओमिक्रॉन प्रकाराच्या लक्षणात्मक संसर्गापासून 70-75 टक्के संरक्षण प्रदान करू शकतो.
आरोग्य एजन्सीने म्हटले आहे की, ऑक्सफर्ड / ऍस्ट्राझेनेका आणि फायझर/बायोएन्डटेक लसींचे दोन्ही डोस, ज्यांचा भारतात कोविशील्ड म्हणून वापर केला जात आहे, कोविड-19 च्या डेल्टा प्रकारापेक्षा ओमिक्रॉनपासून कमी संरक्षण प्रदान करते. तथापि, लसीचा तिसरा बूस्टर डोस नवीन प्रकाराविरूद्ध प्रतिकारशक्ती वाढवतो. हे दावे 581 ओमिक्रॉन संक्रमित प्रकरणांमधील डेटाच्या विश्लेषणावर आधारित आहेत.
UKHSA च्या म्हणण्यानुसार, 'सध्याच्या परिस्थितीत कोणताही बदल न झाल्यास या महिन्याच्या अखेरीस ब्रिटनमध्ये संसर्गाची प्रकरणे दहा लाखांच्या पुढे जातील असा अंदाज आहे. प्राथमिक डेटा सूचित करतो की, बूस्टर डोस नवीन प्रकाराविरूद्ध 70-75 टक्के संरक्षण प्रदान करू शकतो.
हे आकडे पूर्णपणे नवीन असले तरी त्यामुळे अंदाजात बदल होण्याची शक्यता आहे. तज्ञांनी सांगितले की, कोविड -19 च्या तीव्रतेविरूद्ध ही लस अजूनही चांगली संरक्षण करु शकते, जी रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी आवश्यक आहे.
UKHSA मधील लसीकरण प्रमुख डॉ. मेरी रामसे म्हणाल्या, 'प्रारंभिक अंदाज पाहता, सावधगिरीने पुढे जावे. असे संकेत आहेत की दुसऱ्या डोसनंतर काही दिवसांनी, डेल्टा प्रकाराच्या तुलनेत ओमिक्रॉनचा संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. आम्हाला आशा आहे की कोविड-19 च्या गंभीर लक्षणांवर ही लस चांगले परिणाम देईल. जर तुम्ही अद्याप लसीचा पहिला डोस घेतला नसेल, तर ती लवकरात लवकर घ्या.