नवी दिल्ली : 1 जून म्हणजेच सोमवारपासून संपूर्ण देशात 'वन नेशन, वन रेशन कार्ड' ही योजना सुरु होणार आहे. 'वन नेशन वन रेशन कार्ड' ही योजना 20 राज्यांत सुरु होणार आहे. या योजनेअंतर्गत 67 कोटी गरीब लोकांना फायदा होणार आहे. केंद्र सरकारच्या या योजनेमुळे एखाद्या व्यक्ती राहत असलेल्या मूळ राज्याव्यतिरिक्त ती व्यक्ती दुसऱ्या राज्यातूनही रेशन घेऊ शकते. अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी आर्थिक पॅकेजची घोषणा करताना याबाबत माहिती दिली होती.
देशभरात 1 जूनपासून रेशन कार्डबाबतची 'वन नेशन, वन कार्ड' ही योजना लागू होणार आहे. या योजनेमुळे, रेशन कार्ड कोणत्याही राज्यात बनलेले असलं तरी, रेशन कार्डधारकाला रेशन धान्य खरेदी करण्यासाठी या रेशन कार्डचा उपयोग दुसऱ्या राज्यातही करता येणार आहे. यामुळे गरीबांना मोठा फायदा होणार आहे.
'वन नेशन, वन रेशन कार्ड' या योजनेअंतर्गत एकाच रेशन कार्डचा वापर देशभरात कुठेही करता येणार आहे. कोणत्याही राज्यातील रेशन कार्डधारक, कोणत्याही अन्य राज्यातील रेशनच्या दुकानातून कमी किंमतीत स्वस्त धान्य खरेदी करु शकतात. या योजनमुळे भ्रष्टाचारावर लगाम बसेल. तसंच रोजगार किंवा इतर कोणत्याही कारणास्तव एका ठिकाणाहून, दुसऱ्या ठिकाणी जाणाऱ्या गरीबांना अनुदानित रेशन नाकारलं जाणार नाही, यापासून त्यांना वंचित राहावं लागणार नाही.
रेशन कार्ड धारकांना पाच किलो तांदुळ तीन रुपये किलोच्या दरात आणि गहू दोन रुपये किलोने मिळणार आहे. रेशन कार्डवर एक स्थानिक भाषा आणि दुसरी हिंदी किंवा इंग्रजी अशा दोन भाषा असणार आहेत.
या योजनेअंतर्गत होणारे फायदे -
- या योजनेचा सर्वाधिक फायदा गरीबांना होणार आहे
- एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करण्याऱ्यांना फायदा होईल
- बनावट रेशन कार्ड तयार करण्यावर रोख लावण्यात येईल
- सर्व रेशन कार्ड आधार कार्डशी जोडण्यात येण्याची आणि पॉइंट ऑफ सेल (Point of Sale, PoS) मशीनद्वारे धान्याचं वितरण करण्याची व्यवस्था लवकर सुरु होईल
- 85 टक्के आधार कार्ड पॉइंट ऑफ सेलशी जोडण्यात आले आहेत.
- 22 राज्यांमध्ये 100 टक्के पीओएस मशीन लावण्यात आल्या आहेत.
या योजनेमुळे जनता कोणत्याही एकाच रेशन दुकानाशी बांधली जाणार नाही आणि दुकान मालकांवर अवलंबून राहणं कमी होईल. तसंच भ्रष्टाचारही कमी होण्यास मदत होईल. या योजनेमुळे सरकारकडून सर्व रेशनकार्डसाठी केंद्रीय भांडार तयार करुन त्यांना आधारशी जोडून संपूर्ण पोर्टेबिलिटीची सुविधा देण्यात येईल. यामुळे लोकांना कोणत्याही एकाच रेशन दुकानातून धान्य खरेदी करण्यास भाग पाडले जाणार नाही. 'वन नेशन, वन रेशन कार्ड' या योजनेमुळे रेशन दुकानदार ग्राहकांशी कोणतीही मनमानी करु शकणार नाही.