३ महिन्यांआधीच सरकारला इशारा दिला होता- शरद पवार

सरकारने मोठी चूक केली, शरद पवारांंचं वक्तव्य

Updated: Dec 8, 2019, 02:31 PM IST
३ महिन्यांआधीच सरकारला इशारा दिला होता- शरद पवार

नवी दिल्ली : देशभरामध्ये कांद्याचा भाव २०० रुपये किलोपर्यंत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. कांद्याच्या या वाढलेल्या दरांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलं आहे.

'तीन-चार महिन्यांआधी शेतकरी त्यांचा कांदा रस्त्यावर फेकून देत होते. त्यावेळी केंद्र सरकारने कांद्याला योग्य भाव दिला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी कांद्याऐवजी दुसरं पीक घेण्याचा निर्णय घेतला. आता ते कांदा तुर्कीमधून आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारची ही चूक होती. मी ३ महिन्यांपूर्वीच केंद्र सरकारला पत्र लिहून कांद्याचे भाव वाढतील, असा इशारा दिला होता,' असं शरद पवार म्हणाले.

एका इंग्रजी वृत्तपत्राला शरद पवारांनी मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी राज्यातलं महाविकासआघाडी सरकार आणि कांद्याच्या प्रश्नावर भाष्य केलं. उद्धव ठाकरे यांच्या सरकारचा रिमोट माझ्या हातात नसेल, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं. सरकार चालवतानाचे निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील, पण ते माझ्याकडे सल्ला मागायला आले, तर तो नक्की देऊ, असं वक्तव्य शरद पवारांनी केलं.

'अशी परिस्थिती येते तेव्हा तुम्हाला तडजोड करण्याशिवाय काहीही पर्याय नसतो. फक्त शिवसेनाच नाही तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही तडजोड केली आहे. काँग्रेसने शिवसेनेकडे सेक्युलरिझमचा आग्रह धरला. शिवसेनेनेही तो आग्रह मान्य केला. कोणतंही सरकार संविधानाचा आदरच करेल, त्यामुळे शिवसेना हो म्हणाली. आम्ही संविधानाचा आदर करतो. संविधानाच्या मुद्द्यावरच सरकार स्थापन करु, असं शिवसेनेनं सांगतिलं. संविधानाशिवाय दुसरं काही कशाला विचारायचं?' असा सवाल शरद पवारांनी केला.

'सुरुवातीला शिवसेना आणि राष्ट्रवादीने अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद वाटून घ्यायचं, असा विचार सुरु होता. पण शिवसेनेने ५ वर्ष मुख्यमंत्रीपदाचा आग्रह धरला. आम्हीही शिवसेनेचा आग्रह मान्य केला. राष्ट्रवादी काँग्रेसनेही यासाठी तडजोड केली,' अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली.