वादळी पावसाने घेतले राजस्थान, उत्तर प्रदेशात १२३ जणांचे बळी

येत्या 36 तासांत राजस्थान आणि उत्तरप्रदेशात पुन्हा एकदा वादळासह मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्यानं दिला आहे.

Updated: May 4, 2018, 10:21 AM IST
वादळी पावसाने घेतले राजस्थान, उत्तर प्रदेशात १२३ जणांचे बळी title=

नवी दिल्ली:  मुसळधार पावसासह वादळानं राजस्थान तसंच उत्तर प्रदेश राज्याला जबर तडाखा दिला आहे. या नैसर्गिक आपत्तीत किमान १२३ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यापैकी उत्तरप्रदेशातल्या मृतांचा आकडा ७० असून, राजस्थानमध्ये ३८ जणांचा बळी गेलाय. उत्तरप्रदेशातल्या आग्रा जिल्ह्याला वादळाचा सर्वाधिक फटका बसला असून, या जिल्ह्यात किमान ४३ जणांचा मृत्यू झालाय. तर राजस्थानातल्या भरतपूर जिल्हाचं या नैसर्गिक आपत्तीत सर्वात जास्त नुकनास झालंय.

राजस्थानातल्या जखमींचा आकडा शंभरीपार

भरतपूरमध्ये दगावलेल्यांची संख्या १९ इतकी आहे. उत्तरप्रदेशात ८३ जण जखमी झाले असून, राजस्थानातल्या जखमींचा आकडा शंभर इतका आहे. अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडल्याची, तसंच पिकांचं अतोनात नुकसान झाल्याची माहिती मिळतेय. यामुळे जनजीवन पुरतं ठप्प झालं आहे.

जनजीवन विस्कळीत

वादळाचा जोर इतका तीव्र होता, की तब्बल १०० किलोमीटर प्रति तास इतक्या वेगानं वारे वाहत होते. त्यामुळे अनेक ठिकाणी पत्र्याची छप्परं उडून गेली, तसंच विद्युत खांब कोलमडून पडले. येत्या 36 तासांत राजस्थान आणि उत्तरप्रदेशात पुन्हा एकदा वादळासह मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्यानं दिला आहे.