J&K encounter : राष्ट्रीय रायफल्सच्या 19 व्या बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल मनप्रीत सिंह (Colonel Manpreet Singh), मेजर आशिष धोंचक (Major Ashish Dhonchak) आणि जम्मू काश्मीरचे पोलीस उपअधीक्षक हुमायूँ भट (Humayun Bhat). काश्मीरच्या अनंतनाग भागातल्या कोकरनाग जंगलात अतिरेक्यांशी (Terrorist) झालेल्या चकमकीत शहीद झालेले बडे अधिकारी. पाकिस्तानातून आलेले दहशतवादी जंगलात लपून बसल्याची टीप मिळाल्यानंतर कर्नल सिंह स्वतः मोहीमेचं नेतृत्व करत होते. मात्र दहशतवाद्यांशी दोन हात करताना या तिघा बड्या अधिकाऱ्यांना हौतात्म्य आलं.दहशतवाद्यांसह झालेल्या चकमकीत कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष आणि जम्मू काश्मीरचे पोलीस अधीक्षक हुमायून भट गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं होतं. पण त्यांना वीरमरण आलं. या चकमकीत एक जवानही शहीद झाला आहे.
अनंतनागमध्ये चकमक
अनंतनाग (Anantnag) जिल्ह्यातील गडोले परिसरात दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कर आणि पोलिसांकडून शोधमोहीम सुरु करण्यात आली होती. कर्नल सिंग या कारवाईचं नेतृत्व करत होते. यावेळी दहशतवाद्यांनी लष्कराच्या पथकावर गोळीबार सुरु केला. जवानांनीही त्याला प्रत्युत्तर दिलं.
टीआरएफने घेतली जबाबदारी
टीआरएफ अर्थात द रेजिस्टेंस फ्रंट या दहशतवादी संघटनेनं या चकमकीची जबाबदारी घेतलीय. गेल्या 8 सप्टेंबरला पाकिस्तानातील मशिदीत लष्कर कमांडर रयाज अहमद ऊर्फ कासिम याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्या हत्येचा बदला घेतल्याचा दावा टीआरएफनं केलाय...
TRF चं पाकिस्तान कनेक्शन?
TRF या दहशतवादी संघटनेचं अस्तित्व 2019 मध्ये समोर आलं. केंद्रीय गृह खात्यानं या संघटनेवर बंदी घातलीय. हाफिज सईदच्या लष्कर-ए-तोयबा संघटनेशी टीआरएफचे धागेदोरे जुळलेत. TRF ही संघटना लष्कर-ए-तोयबाचाच मुखवटा आहे. सीमेपलीकडून पाकिस्तानातून TRFची सूत्रं हलवली जात असल्याचं सांगितलं जातंय. 2020 मध्ये भाजप कार्यकर्ता फिदा हुसैन, उमर राशिद बेग आणि उमर हाजम यांच्या हत्येत टीआरएफचाच हात असल्याचं समजतंय.
दरम्यान, अनंतनाग चकमकीनंतर दहशतवाद्यांचा ठावठिकाणा शोधण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी अख्खं जंगल पिंजून काढण्यास सुरूवात केलीय.. तर दुसरीकडं यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्यात.
14 फेब्रुवारी 2019 रोजी जैश-ए-मोहम्मदनं पुलवामा हल्ला घडवून आणला. त्यावेळी पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आला. तेव्हा दहशतवादी संघटनांवर कारवाई करण्यासाठी पाकिस्तानवर दबाव वाढला.. त्यामुळंच आता टीआरएफसारख्या नव्या संघटनांना पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून खतपाणी घातलं जातंय. काश्मीरात पुन्हा एकदा 90 च्या दशकासारख्या घातपाती कारवाया घडवण्याचा पाकिस्तानचा हा कट हाणून पाडण्याची गरज आहे.