मुंबई : केंद्र सरकारने पासपोर्ट काढण्यासाठी कागदपत्रांची कटकट कमी केली आहे. त्यामुळे आता पासपोर्ट काढणे अधिक सोपे झाले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्ट सेवा कार्यक्रमासाठी (Passport Seva Programme) डिजीलॉकर प्लॅटफॉर्मचे (DigiLocker Platform) उद्घाटन केले. ही सुविधा सुरू झाल्याने पासपोर्ट तयार करणार्यांना अर्जाच्या वेळी सर्व मूळ कागदपत्रे दाखवावी लागणार नाहीत. डिजीलॉकर प्रोग्रामद्वारे संपूर्ण प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे.
डिजिटलायझेनच्या दिशेने एक पाऊल टाकण्यात आले आहे. आता भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पुढाकर घेत पासपोर्ट सेवा आणखी सोपी करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी आता पासपोर्ट सेवा प्रोग्राममध्ये डिजीलॉकर ही नवी सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी या नव्या योजनेचे उद्घाटन केले आहे. पासपोर्ट घेणाऱ्यांसाठी ही सुविधा अतिशय सोपी आहे. त्यामुळे याचा निश्चित फायदा होईल, असे मत परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन (V Muraleedharan) यांनी यावेळी व्यक्त केले.
मंत्री मुरलीधरन यांच्या म्हणण्यानुसार, पासपोर्ट सेवा कार्यक्रम हा देशातील पासपोर्ट सेवांच्या विस्तारामध्ये मोठा बदल आहे. यामुळे पासपोर्ट तयार करणार्यांना मोठी सोय होईल. परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार गेल्या सहा वर्षांत पासपोर्ट (passport) काढणाऱ्यांची संख्या वाढली आहे. दर महिन्याला पासपोर्टसाठी अर्ज करणार्यांची संख्या वाढत आहे. 2017 मध्ये प्रथमच एका महिन्यात 10 लाखाहून अधिक लोकांनी अर्ज केले.
नागरिकांच्या सोयीसाठी परराष्ट्र मंत्रालयाने अनेक महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. एकीकडे पासपोर्टचे नियम मोठ्या प्रमाणात सोपे आणि सुटसुटीत केले गेले आहेत तर दुसरीकडे घराजवळही पासपोर्ट बनण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रमुख पोस्ट ऑफिसमध्ये पासपोर्ट सेवा केंद्रे सुरू केली गेली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 426 पोस्ट ऑफिसमध्ये पासपोर्ट सेवा केंद्र (POPSK) कार्यान्वित झाली आहेत आणि लवकरच यात आणखी यात भर पडणार आहे. देशात पासपोर्ट बनविण्यासाठी एकूण 555 ठिकाणाहून पासपोर्ट काढता येऊ शकणार आहेत. तशी केंद्रे सुरु करण्यात येणार आहेत.
कोरोना कालावधीत नागरिकांची सुरक्षा वाढवण्यासाठी, देशात ई-पासपोर्ट बनवण्याची प्रक्रियाही सुरू आहे. लवकरच ई-पासपोर्ट सुविधा सुरू केली जाईल. याशिवाय पुढील माहिती ई-पासपोर्टद्वारे सुरक्षित ठेवली जाईल. डिजिटल इंडिया मिशन अंतर्गत, प्रत्येक सेवेचे डिजिटायझेशन केले जात आहे, जेणेकरून लोकांना घराघरात सुविधा मिळू शकेल.
इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाच्या माध्यमातून डिजिटल इंडिया प्रोग्रोम अंतर्गत परराष्ट्र मंत्रालयाने डिजीलॉकर सिस्टम सुरु केली आहे. नागरिकांना पासपोर्ट काढताना, जास्तीत जास्त सोयीस्कर व्हावे, यासाठी ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यामध्ये नव्याने पासपोर्ट काढणाऱ्यांना तर लाभ होणारच आहे. पण, पासपोर्ट हरवला किंवा नव्याने काढण्यात येणार असले तर, डिजीलॉकर सिस्टम सर्वाधिक फायदेशीर ठरणार आहे, असा दावा पराराष्ट्र मंत्रालयाने केला आहे.
पासपोर्ट काढताना नागरिकांना पेपरलेस पद्धतीने कागदपत्रे जमा करता येणार आहेत. पासपोर्ट कार्यालयात कागदपत्रे मूळ घेऊन जाण्याची गरज भारणार नाही. डिजीलॉकरमधील वॉयलेटमधील कागदपत्रे ओरिजनल म्हणून ग्राह्य धरली जाणार आहेत. पासपोर्टची व्यवस्था डिजिटल करण्याच्या दिशेने हे महत्वाचे पाऊल असणार आहे. पासपोर्ट हरवला किंवा गहाळ झाल्यास नवा पासपोर्ट घेताना, कागदपत्रांची कटकट असणार नाही. त्यासाठी डिजीलॉकर महत्वाची भूमिका बजावणार आहे.