एटीएममध्ये तांत्रिक बिघाड, २ हजार रुपये काढणाऱ्यांना मिळाले २० हजार

एटीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ५ दिवस ग्राहक चांगलेच मालामाल झाले आहेत.

Updated: Sep 8, 2019, 11:04 PM IST
एटीएममध्ये तांत्रिक बिघाड, २ हजार रुपये काढणाऱ्यांना मिळाले २० हजार title=

मथुरा : एटीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ५ दिवस ग्राहक चांगलेच मालामाल झाले आहेत. मथुरेतल्या घंटाघर परिसरातल्या बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये हा तांत्रिक बिघाड झाला होता. ज्यामुळे २ हजार रुपये काढायला गेलं तर २० हजार रुपये मिळत होते. २० हजार रुपये मिळाल्यानंतरही ग्राहकांच्या खात्यातून २ हजार रुपये गेल्याचीच एन्ट्री होत होती. त्यामुळे जवळपास १० लाख ७ हजार रुपये एटीएममधून काढल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

एटीएममध्ये पैसे टाकणाऱ्या सीएमएस कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी ३ सप्टेंबरला १८ लाख रुपयांची रक्कम एटीएम मशीनमध्ये टाकली. यानंतर तांत्रिक बिघाडामुळे २ हजार रुपयांऐवजी २० हजार रुपये यायला लागले. एटीएममध्ये कोणताही सुरक्षा रक्षक नसल्यामुळे कोणालाच याबद्दल माहिती नव्हती. एक ग्राहक एटीएममधून २० हजार रुपये काढायला गेला, तेव्हा त्याला ५० हजार रुपये मिळाले, पण त्याच्या खात्यातून २० हजार रुपयेच कमी झाले.

हा ग्राहक पैसे परत करण्यासाठी बँकेत गेला, तेव्हा बँकेला याबद्दल माहिती मिळाली. यानंतर बँकेने एटीएम ताबडतोब बंद केलं आणि याची माहिती एटीएममध्ये रोकड टाकणाऱ्या कंपनीला दिली.

या प्रकारानंतर कंपनीचे वरिष्ठ मॅनेजर ओंकार सिंग आणि बँकेचे मॅनेजर नवनीत कुमार यांनी एटीएममधून १० लाख ७ हजार रुपये जास्त काढल्याची तक्रार पोलिसांकडे केली आहे. एटीएम कोडच्या माध्यमातून सगळ्या ग्राहकांची माहिती मिळेल आणि त्यांच्याकडून हे पैसे परत घेतले जातील, असं सांगण्यात आलं आहे.