कोरोना विरुद्ध लढाई मोठी, थकायचं नाही आणि हरायचं नाहीये- पंतप्रधान मोदी

पंतप्रधान मोदींचं कार्यकर्त्यांना कोरोना विरुद्ध लढण्यासाठी तयार राहण्याचं आवाहन

Updated: Apr 6, 2020, 01:16 PM IST
कोरोना विरुद्ध लढाई मोठी, थकायचं नाही आणि हरायचं नाहीये- पंतप्रधान मोदी title=

नवी दिल्ली : भाजपच्या 40 व्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी कार्यकर्त्यांना संबोधित केले. त्यांनी म्हटलं की, कोरोना या जागतिक महामारीचा सामना करण्यासाठी आतापर्यंत केलेल्या प्रयत्नांनी जगासमोर एक वेगळे उदाहरण ठेवलं आहे. भारत हा जगातील एक देश आहे ज्याला कोरोना विषाणूची तीव्रता समजली आणि कालांतराने त्याविरुद्ध व्यापक युद्ध सुरू केले. कोरोनाविरूद्ध लढा हा बराच काळ असणार आहे. आपल्याला थकायचं नाही आणि हरायचं देखील नाही.

पंतप्रधान म्हणाले की, भारताने प्रत्येक पातळीवर महत्त्वाचे निर्णय घेतले. राज्य सरकारांच्या सहकार्याने या निर्णयांना वेग आला. ज्या वेगाने आणि सहभागाने भारताने काम केलं. त्याचं जागतिक आरोग्य संघटनेनेही कौतुक केले आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, एकामागून एक देशाने अनेक निर्णय घेतले आहेत. ते निर्णय प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले गेले. सर्व सरकारांनाबरोबर काम करताना कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी घेतली.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'आमच्या पक्षाचा स्थापना दिवस अशा वेळी आला आहे जेव्हा केवळ देशच नाही तर संपूर्ण जग कठीण परिस्थितीतून जात आहे. आव्हानांनी भरलेले हे वातावरण आपली मूल्ये, आपले समर्पण, देशसेवेसाठी आमची वचनबद्धता आणखी वाढवते.'

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, काल रात्री 9 वाजता आम्ही 130 कोटी देशवासियांची सामूहिक शक्ती पाहिली. प्रत्येक वर्ग, सर्व वयोगटातील, श्रीमंत आणि गरीब, सुशिक्षित आणि अशिक्षित सर्वांनी एकत्रितपणे या एकतेच्या शक्तीला नमन केले आणि कोरोनाविरूद्ध लढण्याचा आपला संकल्प दृढ केला.' ते म्हणाले की, 'लॉकडाऊनच्या वेळी भारतीय लोकांनी दर्शविलेले परिपक्वता अभूतपूर्व आहे.'

पीएम मोदी म्हणाले की, ही एक मोठी लढाई आहे. कंटाळून जाऊ नका, पराभूत होऊ नका. बरीच लढाई लढायची आहे आणि ती जिंकायची आहे. आज देशाचे ध्येय आणि संकल्प एक आहे - कोरोना साथीच्या विरूद्ध लढ्यात विजय.

भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, 'पक्षा पेक्षा मोठा देश हाच मंत्र शिकवला गेला आहे. सेवा आपल्या मूल्यांमध्ये आहे. कोरोनाच्या या कठीण काळात आपली जबाबदारी आणखीनच वाढते.'