भोपाळ : लोकसभा निवडणूक २०१९ च्या शेवटच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यप्रदेशात लोकांना संबोधित केलं. यावेळी नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, 'मी प्रचाराची सुरुवात मेरठमध्ये केली होती आणि शेवट खरगौनमध्ये करत आहे. यावेळी संपूर्ण देश म्हणतो आहे की, पुन्हा एकदा मोदी सरकार, अबकी बार ३०० पार'.
पंतप्रधान मोदींनी म्हटलं की, '१९ तारखेला तुम्ही मतदान कराल तेव्हा तुम्ही इतिहास रचणार आहात. तुम्ही दुसऱ्यांदा पूर्ण बहुमताचं सरकार आणणार आहात. यंदा संपूर्ण देश कोणत्या पक्षासाठी नाही तर देशासाठी मतदान करत आहे. जनता सरकार नाही तर देशाचं भविष्य बनवण्यासाठी मतदान करत आहे.'
पंतप्रधान मोदींनी यावेळी काँग्रेसवर टीका करत म्हटलं की, 'काँग्रेस सैनिकांचा विशेषाधिकार काढून, देशद्रोहाचा कायदा संपवण्याची भाषा करत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये वेगळ्या पंतप्रधानांचं समर्थन करणाऱ्या लोकांना लोकांनी नाकारलं आहे. या निवडणुकीत जनता त्यांना शिक्षा देईल.'
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका करत पंतप्रधान मोदींनी म्हटलं की, 'मध्यप्रदेशात १५० दिवस झाले तर कर्जमाफी झाली नाही. हे लोकं वीजबिल अर्ध करणार होते. पण यांनी वीजच अर्धी करुन टाकली. मध्य प्रदेशात अडीच मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांना देखील काम करता येत नाही आहे.'